राज्यातील कुलगुरूपदाचे निकष बदलणार
By Admin | Updated: February 12, 2015 00:22 IST2015-02-11T23:51:24+5:302015-02-12T00:22:27+5:30
कृषी विद्यापीठ : संचालकपदाचा अनुभव पाचऐवजी तीन वर्षे करण्याच्या हालचाली

राज्यातील कुलगुरूपदाचे निकष बदलणार
शिवाजी गोरे- दापोली -राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील प्राध्यापक व त्यावरील पदे गेली अनेक वर्षे भरली नसल्याने कृषी विद्यापीठ निवड समितीला कुलगुरूपदासाठी राज्यातून एकही पात्र उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची भरती प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. कुलगुरूपदासाठी लागणाऱ्या संचालकपदाच्या पाच वर्षांच्या अनुभवाचा निकष बदलून आता तो तीन वर्षे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सरकारने गेली पाच वर्षे प्राध्यापक व त्यावरील पदांची भरती केलेली नाही. त्यामुळे कृषी क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. २००८ पासून कृषी विद्यापीठातील प्राध्यापक व त्यावरील संचालकपदांची भरती प्रक्रिया न झाल्याने शास्त्रज्ञांवर अन्याय झाला आहे. ही पदे भरली असती तर कृषी विद्यापीठांना पूर्ण क्षमतेने काम करणारे संचालक मिळाले असते. पाच वर्षे ही प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे पात्रता असून सुद्धा लोकांना संधी मिळालेली नाही. कुलगुरूपदासाठी संचालकपदाचा पाच वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. मात्र, भरतीच न झाल्यामुळे सध्याच्या घडीला कोणीही हा निकष पूर्ण करू शकत नाही.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरुपद डिसेंबर २0१४मध्ये रिक्त होणार होते. त्यामुळे आॅक्टोबर २०१४ मध्ये डॉ. आयप्पन यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर कुलगुरुपदासाठी अर्ज मागवण्यात आले. नवीन राज्यपालांनी या भरतीला हिरवा कंदील दाखविला.
विहित नमुन्यात व मुदतीत आलेल्या अर्जांची छाननी झाली. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दोन महिने निवड समितीने या भरती प्रक्रियेचे काम पाहिले; परंतु पाच वर्षे संचालकपदाचा अनुभव असणारा योग्य उमेदवार मिळाला नाही. कुलगुरूपदाची वयोमर्यादा ६५ वर्ष आहे.
निवृत्त झालेल्या काही संचालकांना पाच वर्षांचा अनुभव आहे. मात्र, त्यांच्याकडे कुलगुरूपद सोपवले तर फारच थोड्या काळासाठी या पदावर काम करू शकतील. त्यामुळे त्यांनाही डावलण्यात
येऊन दापोली कोकण कृषी
विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा निर्णय स्थगित ठेवण्यात आला.
१९ डिसेंबर २०१४ रोजी डॉ. किसन लवांडे कुलगुरुपदावरून निवृत्त झाले. त्याच दिवशी नवीन कुलगुरुंनी पदभार स्वीकारणे अपेक्षित होते; परंतु पात्र उमेदवार न मिळाल्याने
दापोलीचा निर्णय स्थगित ठेवण्यात आला
आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. व्ही. व्यंकटेश्वर यांच्याकडे दापोलीचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात
आला. दोन महिने दापोली कृषी विद्यापीठाचा कार्यभार अतिरिक्त कुलगुरू मराठवाड्यातून हाकत आहेत.
राज्यातील कृषी विद्यापीठाची संचालकपदे न भरल्याने ‘आयसीआर’च्या एखाद्या
संशोधन केंद्रावर काम करणाऱ्या व्यक्तीला कुलगुरुपदी संधी मिळू शकते; परंतु राज्यातील कृषी विद्यापीठात प्राध्यापक, विभागप्रमुख, प्राचार्य या पदावर काम करणाऱ्याला संधी मिळत नाही.
शिक्षण, संशोधन, विस्तार या तिन्ही स्तरांवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना संधी मिळत नाही. त्यामुळे कुलगुरुपदाचे निकष बदलण्याची गरज असल्याचे वारंवार पुढे येत आहे.
राज्यपालांनी सूचना मागवल्या
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी पात्र उमेदवार न मिळाल्याने राज्यपालांनी चारही कृषी विद्यापीठांकडून सूचना मागवल्या असून, या सूचनांचा अभ्यासपूर्ण विचार करून कुलगुरू निवडीचे निकष बदलण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. संचालकपदाचा पाच वर्षांचा अनुभव कमी करून तो तीन वर्षे करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील मराठी शास्त्रज्ञांना कुलगुरूपदाची संधी मिळणार आहे. लवकरच त्याबाबतचा अध्यादेश काढला जाईल, असे अपेक्षित आहे.