राज्य पोलिसांची पुन्हा नाचक्की!
By Admin | Updated: February 18, 2015 02:45 IST2015-02-18T02:45:54+5:302015-02-18T02:45:54+5:30
कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला लिपिकने पोलिसांकडे व वरिष्ठांकडे केल्याने महाराष्ट्र पोलीस दलाची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे.

राज्य पोलिसांची पुन्हा नाचक्की!
धक्कादायक : अतिरिक्त महासंचालकांवर महिला लिपिकचा विनयभंगाचा आरोप
डिप्पी वांकाणी - मुंबई
अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि गृहरक्षक दलाचे उप महासमादेशक सुरिंदर कुमार यांनी विनयभंग केल्याची लेखी तक्रार त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला लिपिकने पोलिसांकडे व वरिष्ठांकडे केल्याने महाराष्ट्र पोलीस दलाची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे.
सोमवारी दुपारी सुरिंदर कुमार यांनी कार्यालयात आपल्या अंगाला असभ्यपणे स्पर्श केला, अशी तक्रार या महिलेने केली आहे. मात्र १९८५ च्या तुकडीचे ‘आयपीएस’ अधिकारी असलेल्या ५९ वर्षीय सुरिंदर कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना याचा इन्कार केला. सुरिंदर कुमार म्हणाले, की हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे व अशा प्रकरणांत प्रसिद्धी माध्यमांशी बोलू नये, असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. माझ्यावर केलेल्या आरोपांचा मी इन्कार करतो. पण याचा मी व तक्रारदार दोघांच्याही चारित्र्याशी संबंध असल्याने मी अधिक तपशिलात बोलणार नाही. कायद्याला त्याचे काम करू द्या. गृहरक्षक दल मुख्यालयातील एका सूत्रानुसार सुरिंदर कुमार यांनी या तक्रारदार महिलेकडे तिचे वैवाहिक संबंध व मुलांविषयी ३-४ दिवसांपूर्वी चौकशी केली होती. सोमवारी दुपारी १च्या सुमारास कुमार यांनी या महिलेस आपल्या दालनात बोलावून घेतले व तिच्या अंगाला असभ्यपणे स्पर्श केला, असे या महिला लिपिकचे म्हणणे आहे.
सूत्रांनुसार बाहेर आल्यावर त्या महिने घडला प्रकार कार्यालयातील सहकाऱ्यांना सांगितला. त्या वेळी गृहरक्षक दलाचे महासंचालक अहमद जावेद कार्यालयात नव्हते. सायंकाळी चार वाजता अहमद जावेद आल्यावर या महिलेने घडलेली कथित घटना त्यांच्या कानावर घातली. अहमद जावेद यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की तक्रारदार महिलेने मला जेव्हा ही घटना सांगितली तेव्हा एक तर ती आमच्या कार्यालयाच्या महिला शाखेकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करू शकते, असे मी तिला सांगितले. तिने पोलिसांकडे तक्रार करण्याचा पर्याय निवडला. या महिलेने कुलाबा पोलिसांकडे सोमवारी रात्री लेखी तक्रार केली; पण त्यांनी अद्याप ‘एफआयआर’ नोंदविलेला नाही.
आज सुटी असल्याने लगेच काही कारवाई केली नाही. बुधवारी काय प्रगती होते, ते पाहून योग्य ती कारवाई केली जाईल.
-अहमद जावेद, महासंचालक, होमगार्ड
कुलाबा पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की तक्रारदार महिलेचे आपल्या पतीशी लफडे आहे, असे सांगत होमगार्ड्समधील एका लिपिकाच्या पत्नीने आॅफीसमध्ये गेल्या महिन्यात तमाशा केला होता. त्यामुळे गुन्हा नोंदविण्याआधी आम्ही शहानिशा करीत आहोत.