कुरुंदवाडमध्ये उद्यापासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
By Admin | Updated: May 1, 2015 00:31 IST2015-05-01T00:28:11+5:302015-05-01T00:31:27+5:30
येथील तबक उद्यानातील कै. दिनकर सातपुते क्रीडानगरीत कै. आर. के. पाटील रौप्यचषक स्पर्धेसाठी राज्यभरातून पुरुष व महिला गटातील सुमारे ६० संघ सहभागी होणार

कुरुंदवाडमध्ये उद्यापासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
कुरुंदवाड : येथील साधना मंडळ व राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राज्य व जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने २ ते ५ मे अखेर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होत आहेत. येथील तबक उद्यानातील कै. दिनकर सातपुते क्रीडानगरीत कै. आर. के. पाटील रौप्यचषक स्पर्धेसाठी राज्यभरातून पुरुष व महिला गटातील सुमारे ६० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती साधना मंडळाचे अध्यक्ष जयपाल बलवान व आब्बास पाथरवट यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले, या मंडळाचा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी संस्था म्हणून लौकिक आहे. आजपर्यंत या स्पर्धा भरविल्या जात असून, या वर्षीची ही ३६ वी स्पर्धा आहे. ६५ किलो गट पुरुष, ३५ किलो गटाखालील पुुरुष व महिला खुला गट, अशा एकूण तीन गटांत स्पर्धा होणार आहे. कै. दिनकरराव सातपुते क्रीडानगरीत प्रकाशझोतात या स्पर्धा पार पडणार असून, स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, अहमदनगर, ठाणे, नाशिक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा अशा १२ जिल्ह्यांतील पुरुष व महिला गटातील निमंत्रित ४८ संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून, उद्या, शनिवारी सायंकाळी नगराध्यक्ष संजय खोत व उपनगराध्यक्ष वैभव उगळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी एस. जी. सुभेदार, भूपाल दिवटे, महावीर पोमाजे, वैभव उगळे, बाबासो सावगावे, रमेश भुजूगडे उपस्थित होते.