मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय संमेलन
By Admin | Updated: October 29, 2014 00:33 IST2014-10-29T00:16:29+5:302014-10-29T00:33:43+5:30
बुलडाणा येथे मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान.

मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय संमेलन
बुलडाणा : मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत बुलडाण्यात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध कार्यक्रम, चर्चासत्र, परिसंवाद घेण्यात येणार आहेत.
अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, तसेच बुलडाणा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता अधिवेशनाचे नियोजित अध्यक्ष मारोती खेडेकर यांचे स्वागत होईल. ११ वाजता संयुक्त मंडळाची सभा, तर दुपारी तीन वाजता उद्घाटन सोहळा रंगणार आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून खासदार प्रतापराव जाधव, तर अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके राहतील. उद्घाटन सोहळ्याला माजी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्राच्या शिक्षण सचिव अश्विनी भिडे, शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुण्याचे शिक्षण संचालक सर्जेराव जाधव, पुण्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी हजेरी लावणार आहेत.