राजकीय खिचडी, सहकारी चहा...--जिल्हा बँक निवडणूक

By Admin | Updated: May 8, 2015 00:18 IST2015-05-07T23:14:21+5:302015-05-08T00:18:07+5:30

पतंगरावांना उत्तर मिळाले असेल... जयंत पाटील : विरोधकांकडून जत, मिरज सोसायटी गटात धनशक्तीचा वापर

State Khichadi, Cooperative Tea ... - District Bank Election | राजकीय खिचडी, सहकारी चहा...--जिल्हा बँक निवडणूक

राजकीय खिचडी, सहकारी चहा...--जिल्हा बँक निवडणूक

अविनाश कोळी - सांगली
सहकाराच्या नावाखाली सर्वपक्षीय राजकारणाची खिचडी शिजवून जिल्ह्यातील नेत्यांनी एक वेगळाच खेळ जिल्हा बँकेच्या निमित्ताने खेळला. त्यातून जिरवाजिरवीचे राजकारण शिजले आणि धक्कादायक निकालांचा जन्म झाला. वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेसचा धक्का खाऊनही सर्वपक्षीय कपबशी टेबलावर विराजमान झाली. सहकाराच्या नावाखाली यापुढे सत्ताधाऱ्यांच्या हातात काँग्रेसचा हात आला तरी, त्याचे कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.
जिल्ह्याच्या राजकारणाने मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक रंग बदलले. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मांडीला मांडी लावून एकत्र बसले, तर काहींनी स्वकीयांचा हात सोडून स्वहिताचे राजकारण केले. घराणेशाहीच्या विरोधात बोलणाऱ्यांनी घराणेशाहीचाच झेंडा रोवला. काहींनी घोटाळेबाजांवर तोंडसुख घेऊन त्यांच्याशीच मैत्री केली. मित्र आणि शत्रूच्या जिल्ह्यातील संकल्पनांनी नागरिकांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गोंधळात टाकले. बँकेची निवडणूक संपली तरी गोंधळ कायम आहे. सहकाराच्या नावाखाली प्रत्येकाने जिरवाजिरवीचेच राजकारण केल्याचे निकालांवरून दिसून आले.
मिरज तालुक्यात ताकदीचा पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये फूट पडली. मदन पाटील यांनी जयंतरावांच्या पॅनेलमध्ये उडी घेतल्याने त्यांच्याविरोधात त्यांचेच चुलत बंधू विशाल पाटील मैदानात आले आणि मदन पाटील यांचा त्यांनी धक्कादायकरित्या पराभव केला. या तालुक्यात राष्ट्रवादीने मदन पाटील यांना साथ दिली असली तरी, त्यांच्याच गटातील कार्यकर्ते त्यांच्याशी प्रामाणिक राहू शकले नाहीत. एकेका मतदारासाठी दोन्ही नेते धडपडत होते. शह-काटशहच्या राजकारणात मदन पाटील मातब्बर असूनही त्यांना विशाल पाटील यांच्यासारख्या नव्या खेळाडूने मात दिली. मिरज पूर्व भागात विशाल पाटील यांना अजितराव घोरपडेंची रसद लाभदायी ठरली.
जत तालुक्यातील राजकारणात ईर्षेने पेट घेतला. भाजपचे आ. विलासराव जगताप यांनी आ. पतंगराव कदम व त्यांचे बंधू मोहनराव कदम यांच्यावर जहरी टीका केली. त्यामुळे पतंगरावांनी काँग्रेसच्या शिलेदारांना तसेच जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून जगतापांच्या विरोधात ताकद पणाला लावली. कोणत्याही स्थानिक निवडणुकीत पतंगरावांनी आजवर इतकी प्रतिष्ठा पणाला लावली नव्हती. जत तालुक्यात ती दिसली. त्यामुळे तालुक्यात सोसायटी गटात वर्चस्व असूनही जगतापांना त्यांच्या मुलाला निवडून आणता आले नाही. काँग्रेसने क-४ या मजूर, गृहनिर्माण व सर्वसाधारण संस्था गटात काँग्रेसचे सी. बी. पाटील यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला. या गटात अन्य संस्थांपेक्षा मजूर सोसायट्यांचे वर्चस्व अधिक आहे. संग्रामसिंह देशमुख व सी. बी. पाटील यांनी या सोसायट्यांचे प्रतिनिधीत्व केल्यामुळे त्यांच्या पारड्यात या गटातील मतदान पडले आहे. त्यामुळे या गटातील एक जागा शेतकरी पॅनेलने गमावली.

तासगाव तालुक्याचे गणित बिघडले
तासगाव सोसायटी गटात राष्ट्रवादी आणि भाजपचे वर्चस्व आहे. याठिकाणी शेतकरी सहकारी पॅनेलची जागा येणार याबाबत कोणतीही शंका त्यांच्या नेत्यांना नव्हती. तरीही ही जागा त्यांच्या हातून गेली. उमेदवार निवडीवेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या चुका त्यांना महागात पडल्याचे दिसत होते. राष्ट्रवादीच्या मतदारांनी नाराजीपोटी मतदान काँग्रेसच्या पारड्यात टाकले. त्यांच्या नाराजीचे कारण आता राष्ट्रवादीला शोधावे लागणार आहे. उमेदवार निवडीचे अधिकार आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांना देण्यात आले होते. एकाला अधिकार देण्याचे धोरण महागात पडले, की या नाराजीला आणखी कोणते कारण आहे, याचा विचार आता राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत.

पतंगरावांना उत्तर मिळाले असेल...
जयंत पाटील : विरोधकांकडून जत, मिरज सोसायटी गटात धनशक्तीचा वापर
सांगली : काँग्रेसचे नेते पतंगराव कदम आणि मोहनराव कदम यांनी माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवरची टीका केली. त्यांना उत्तर देण्याचे मी टाळले. जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालामुळे जिल्ह्यात कोणाचे वर्चस्व आहे, याचे उत्तर पतंगरावांना मिळाले असेल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केली.
ते म्हणाले की, समविचारी, सहकारी लोकांना एकत्रित केल्यानंतर जिल्ह्यातील मतदारांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या गटांमध्ये विरोधी पॅनेलच्या उमेदवारापेक्षा दुप्पट मते आमच्या उमेदवाराला मिळाली आहेत. माझ्यावर कदम बंधूंनी टोकाची टीका केल्यानंतर, त्यांना मतदारांनीच उत्तर दिलेले आहे.
सोसायटी गटात लागलेल्या धक्कादायक निकालांबाबत ते म्हणाले की, मिरज व जत तालुक्यात विरोधकांकडून धनशक्तीचा वापर झाला. त्यामुळे मदन पाटील, मनोज जगताप यांचा पराभव झाला. तासगावमधील निकाल आम्हा सर्वांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे. निश्चितपणे याठिकाणी आमचे काय चुकले, मतदारांची नाराजी कशामुळे झाली, या सर्व गोष्टींचा शोध घेतला जाईल. (प्रतिनिधी)


‘साई’वर जल्लोष
विशाल पाटील यांचा विजय झाल्याचे जाहीर होताच, त्यांच्या माधवनगर रस्त्यावरील ‘साई’ निवासस्थानावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तेथे फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला. निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी दिवसभर कार्यकर्त्यांची गर्दी होती.
विष्णुअण्णा भवनमध्ये सन्नाटा
माजी मंत्री मदन पाटील यांचा पराभव होताच त्यांचे समर्थक मतमोजणी केंद्रातून निराश होऊन निघून गेले. गेल्या आठ दिवसांपासून पाटील यांच्या निवासस्थानी तसेच विष्णुअण्णा भवनमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी होती. परंतु पाटील यांचा पराभव झाल्याने या दोन्ही ठिकाणी शुकाशुकाट होता. तेथे पोलीस बंदोबस्त दिला होता. काँग्रेस भवन उघडे होते; मात्र सकाळी याठिकाणी कार्यकर्त्यांची फारशी गर्दी नव्हती.

Web Title: State Khichadi, Cooperative Tea ... - District Bank Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.