राज्य माहिती आयोगच अनभिज्ञ
By Admin | Updated: June 30, 2015 03:16 IST2015-06-30T03:16:01+5:302015-06-30T03:16:01+5:30
सर्वसामान्य जनतेला विविध माहिती देण्याबाबत सार्वजनिक प्राधिकरणाला आदेश देणाऱ्या महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाला मात्र त्यांच्याच आदेशाविरोधात न्यायालयात दाखल

राज्य माहिती आयोगच अनभिज्ञ
मुंबई : सर्वसामान्य जनतेला विविध माहिती देण्याबाबत सार्वजनिक प्राधिकरणाला आदेश देणाऱ्या महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाला मात्र त्यांच्याच आदेशाविरोधात न्यायालयात दाखल झालेल्या न्यायालयीन खटल्याच्या दाव्यांची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे न्यायालयीन खटल्याच्या दाव्यांची माहिती मागितली होती. यावर न्यायालयात दाखल प्रकरणांच्या माहितीचे एकत्रित स्वरूपात संकलन संबंधित कार्यालयाकडून केलेले नाही. न्यायालयात आयोगाची प्रकरणे चालविण्यासाठी वकिलांचे पॅनेल नेमण्यात आलेले नाही; शिवाय याबाबतचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती आयोगाचे कक्ष अधिकारी व जन माहिती अधिकारी म.तु. कांबळे यांनी माहिती आधिकार कार्यकर्त्याला दिली.
दरम्यान, यासंबंधी माहिती अधिकार कार्यकर्त्याने दाखल केलेल्या अपीलाच्या सुनावणीवर आयोगाचे सचिव आणि प्रथम अपीलीय अधिकारी भ.बु. गावडे यांनी यापूर्वी आयोगाने दिलेली माहिती अद्ययावत करून १५ दिवसांत उपलब्ध करून द्यावी, असेही आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)