राज्य सरकारचा अनोखा फंडा
By Admin | Updated: May 7, 2015 02:59 IST2015-05-07T02:59:32+5:302015-05-07T02:59:32+5:30
‘मराठी ज्ञानपीठ गौरव सोहळा’ या नावाने होणाऱ्या या सोहळ्यास गर्दी व्हावी म्हणून विनोद तावडे यांच्या मराठी भाषा विभागाने अनोखा फंडा शोधला आहे.

राज्य सरकारचा अनोखा फंडा
नारायण जाधव, ठाणे
कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी म्हणजेच २७ फेबु्रवारीपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना केंद्र सरकारने ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविल्यानंतर त्यांचा सत्कार गुरुवारी (७ मे) गेट वे आॅफ इंडिया येथे आयोजित केला आहे. ‘मराठी ज्ञानपीठ गौरव सोहळा’ या नावाने होणाऱ्या या सोहळ्यास गर्दी व्हावी म्हणून विनोद तावडे यांच्या मराठी भाषा विभागाने अनोखा फंडा शोधला आहे. एरव्ही शासकीय कार्यक्रम म्हटला की त्यात दर्दी लोक येत नाहीत. यामुळे दर्दी नाही किमान गर्दी तरी यावी म्हणून मराठी भाषा विभागाने तातडीने एका शासन निर्णयाद्वारे मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी आणि त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी बजावले आहे. प्रत्येक विभागाच्या प्रमुखाने मंत्रालयासह मुंबई कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे यासाठी आपापल्या विभागस्तरावर सूचना द्याव्यात, असे या आदेशात म्हटले आहे. या सोहळ्यात राज्यातील आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या ययातीकार वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विं.दा.करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यकृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. त्यात अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फय्याज यांच्याह ज्येष्ठ गायक श्रीधर फडके, आशा खाडिलकर, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, नंदेश उमप व मुग्धा वैशंपायन सहभागी होणार आहेत.
मंत्री तावडे यांची संकल्पना
संध्याकाळी ७ ते ९ दरम्यान हा सोहळा रंगणार आहे. त्याची संकल्पना, संयोजन आणि निर्मिती सांस्कृतिक आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांची आहे. त्यामुळेच कदाचित त्यांनी गर्दी जमविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा सूर उमटू लागला आहे.
दर्दी नाही किमान गर्दी तरी यावी म्हणून मराठी भाषा विभागाने तातडीने एका शासन निर्णयाद्वारे मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी आणि त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी बजावले आहे.