लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन हे राज्यपाल, मंत्री, आमदार आणि खासदारांसाठी आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार मराठी माणसांसाठी नवी दिल्लीत भव्य सांस्कृतिक भवन उभारणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी केली. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी मराठी माणसाला आपलेसे वाटेल अशी वास्तू असायला पाहिजे, याकडे लक्ष वेधले होते, हे उल्लेखनीय.
तालकटोरा स्टेडिअममध्ये संमेलनाच्या समारोप सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री उदय सामंत, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, निमंत्रक संजय नहार, शैलेश पगारिया, युवराज शहा यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.