राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
By Admin | Updated: April 8, 2017 05:09 IST2017-04-08T05:09:17+5:302017-04-08T05:09:17+5:30
आजपर्यंत विधिमंडळात अनेक संघर्षाचे प्रसंग घडले मात्र विरोधी पक्षाने कधीही राष्ट्रगीतावर बहिष्कार घातला नव्हता.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
मुंबई : आजपर्यंत विधिमंडळात अनेक संघर्षाचे प्रसंग घडले मात्र विरोधी पक्षाने कधीही राष्ट्रगीतावर बहिष्कार घातला नव्हता. आज कामकाज संस्थगित होताना विरोधी पक्षाने राष्ट्रगीतावरही बहिष्कार घातला. निवडणुकांत सातत्याने झालेल्या पराभवांमुळे विरोधी पक्ष खचून गेला आहे. म्हणूनच त्यांनी ही बहिष्काराची पळवाट शोधून काढली, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांचा समाचार घेतला. विरोधी पक्षाने खरे तर कामकाजात सहभाग घेऊन चर्चा करायला हवी होती, असेही ते म्हणाले.
राज्याच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी सर्वाधिक भांडवली गुंतवणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्याला ८ हजार कोटी रूपयांची थेट मदत करण्यात आली आहे. कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याला निश्चित दिलासा देण्यात येणार आहे. त्याचसोबत जे १ कोटी शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्यांनाही मदत करण्यात येईल. राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विकासनिधीचे समान वाटप झाले पाहिजे, ही आपली भूमिका आहे. शिवसेनेच्या आमदारांनाही समान निधी वाटप करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. प्रामाणिक पत्रकाराला संरक्षण मिळावे, ही आपली भूमिका आहे. त्यासाठीच पत्रकार हल्लाविरोधी विधेयक संमत करण्यात आले आहे. मात्र एका बाजूला प्रामाणिक पत्रकाराला संरक्षण देताना कायद्याचा दुरूपयोग होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
>खडसे नाराज नाहीत
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे स्वपक्षाच्या मंत्र्यांवरच टीका करत असल्याचा प्रश्न केला असता, एकनाथ खडसे हे अजिबात नाराज नाहीत. लोकप्रतिनिधीला जेव्हा जनतेच्या एखाद्या प्रश्नाबाबत सात्विक संताप निर्माण होतो, तेव्हा तो व्यक्त होतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सेनेचा आरोप हास्यास्पद
निवडणुकांमध्ये भाजपाने ५० हजार कोटी रुपये वापरले, हा शिवसेना खा. संजय राऊत यांचा आरोप हास्यास्पद आहे. संजय राऊत यांच्या आरोपांना आपण फार महत्त्व देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.