राज्यात पशुधन खात्यामार्फत दोन हजार पदांची भरती-महादेव जानकर
By Admin | Updated: September 8, 2016 18:11 IST2016-09-08T18:11:15+5:302016-09-08T18:11:15+5:30
शेतकऱ्यांनी त्यांचे भाकड पशुधन कसायाला विकायची गरज नाही. भाकड जनावरांचे पालनपोषण पशुसंवर्धन खात्यामार्फत करून पुन्हा सुदृढ गुरे शेतकऱ्यांना परत दिली जातील.

राज्यात पशुधन खात्यामार्फत दोन हजार पदांची भरती-महादेव जानकर
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 8 - शेतकऱ्यांनी त्यांचे भाकड पशुधन कसायाला विकायची गरज नाही. भाकड जनावरांचे पालनपोषण पशुसंवर्धन खात्यामार्फत करून पुन्हा सुदृढ गुरे शेतकऱ्यांना परत दिली जातील. तालुक्यात राज्यातील पहिले सर्वसुविधायुक्त पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालय तयार करण्यात आले आहे. ते राज्यभर ‘अचलपूर पॅटर्न’ नावाने उभारण्यात येणार असून पंधरवड्यात राज्यभरातील दवाखान्यामध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २२०० रिक्तपदांची भरती मोहीम राबविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विकासमंत्री महादेव जानकर यांनी केले.
अचलपूर येथे पशुसंवर्धन विभागामार्फत दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय बिगर निवासी इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी गुरूवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अचलपुरचे आमदार बच्चू कडू, जिल्हाधिकारी किरण गित्ते, प्रादेशिक सहआयुक्त पी.एस. चव्हाण, विजय रहाटे, अनिल लहाने, भास्कर काचेवार, प्रवीण पाटील, गजानन मोरे, दीपक धूळधर, कार्यकारी अभियंता भावे, प्रमोद भिलपवार उपस्थित होते. बॉक्स २,५०० कोटींचे पॅकेज, ६५ हजारांना रोजगार राज्यात एनडीटीमार्फत अडीच हजार कोटींचे पॅकेज मंजूर झाले आहे. यातून जवळपास ६५ हजार तरूणांना रोजगार व एक लक्ष व्यापार उभा राहणार आहे.
नागपूर, जालनासह राज्यातील काही शहरांचा समावेश यात करण्यात आला आहे. बॉक्स १४ हजार कोटींचा फायदा राज्यात सर्वाधिक १४ हजार कोटींचा फायदा मत्स्य व्यवसायाने दिला आहे. त्याखाली ७ कोटी पशुधन व ६ कोटी दुग्ध व्यवसायातून मिळाले आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वाधिक मदत होत असल्याचे ना. महादेव जानकर यांनी सांगितले. सलमान खान, प्रियंका चोप्रा, गोदरेज, अंबानी सारखे उद्योजक जनावरांच्या पोषणासाठी मदत करणार आहेत. राज्य दूध उत्पादनात सातव्या क्रमांकावर असल्याचे यावेळी जानकर यांनी सांगितले.
चांदूरबाजारला दवाखाना चांदूरबाजार येथे याचप्रकारे पशुचिकित्सालय देण्याची मागणी आ. बच्चू कडू यांनी केली. ती लगेच मान्य करण्यात आली तर भाकड जनावरांचा मुद्दा सुद्धा मंत्र्यांनी निकाली काढला. दूधउत्पादक संघाकडे बंद पडलेले संकलन केंद्र महिला संघाला देण्याची मागणी आ. बच्चू कडू यांनी केली. मेळघाटात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत असल्याचे त्यांनी सांगितले तर शेणखताला अनुदान देण्याची मागणी करीत पुरक जोडधंदा धोरणात्मक निर्णय घेत देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली.