शेतकऱ्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’

By Admin | Updated: July 13, 2016 04:26 IST2016-07-13T04:26:59+5:302016-07-13T04:26:59+5:30

फळे व भाजीपाल्याची विक्री बाजार समित्यांच्या जोखडातून मुक्त करून खुल्या बाजारात शेतकऱ्यांना थेट विक्री करण्यास अनुमती देणारा अध्यादेश जारी करताना त्यासाठीची आवश्यक कोणतीही

The state of the farmers 'no home, no ghat' | शेतकऱ्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’

शेतकऱ्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’

मुंबई : फळे व भाजीपाल्याची विक्री बाजार समित्यांच्या जोखडातून मुक्त करून खुल्या बाजारात शेतकऱ्यांना थेट विक्री करण्यास अनुमती देणारा अध्यादेश जारी करताना त्यासाठीची आवश्यक कोणतीही व्यवस्था राज्य सरकारने केलेली नाही. परिणामी, व्यापारी आणि सरकारच्या भांडणात शेतकऱ्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. तर दुसरीकडे बाजार समित्यांमधील आडत्यांनी दुकाने बंद ठेवल्याने फळ-भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.
खुल्या बाजारात शेतमालाची विक्री करणारे शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठीही नियमन असेल, परवाने त्यांनाही घ्यावे लागतील, असे व्यापाऱ्यांना सांगणाऱ्या सरकारने याबाबत कोणतीही व्यवस्था अद्याप केलेली नाही. त्यामुळे आधीपासून अशा शेतमालाच्या विक्रीचे परवाने असलेल्या खासगी कंपन्यांचेच फावत आहे. बाजार समिती कायद्यात (१९६३) सुधारणा करणारा अध्यादेश राज्य शासनाने जारी केला पण त्या अंतर्गत बाजार समितीबाहेर मालाच्या विक्रीचे कोणतेही नियमन केलेले नाही, असा आरोप नवी मुंबई घाऊक व्यापारी सेनेचे अध्यक्ष सर्जेराव यादव यांनी केला आहे.
बाजार समित्यांबाहेर फळे, भाज्यांची विक्री शेतकऱ्यांनी नेमकी कुठे करावी, या बाबतची ठिकाणी सरकारने अद्याप ठरवून दिलेली नाहीत. शेतकऱ्यांच्या खासगी कंपन्यांनी मॉल्स, मोठ्या हाऊसिंग कॉलनीसह विविध ठिकाणे निवडून विक्री सुरू केली आहे.
पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांची आज सायंकाळी पत्रपरिषद झाली. बाजार समित्यांतील व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ३०७ पैकी २१५ बाजार समित्या सुरू आहेत. बाजार समित्यांतून व्यापार मुक्त केल्याबद्दल आभार मानणारे अनेक फोन आपल्याला आले, असा दावा पोरवाल यांनी केला. या पत्रपरिषदेत एका खासगी कंपनीच्या अधिकारी महिलेने आपल्या कंपनीबाबत माहिती दिली!
बंद पुकारणारे व्यापारी आणि त्यांना साथ देत असलेल्या बाजार समित्यांवर राज्य सरकार कोणती कारवाई करणार, असे पत्रकारांनी विचारले असता अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल म्हणाले की, आजच्या पत्रपरिषदेचा तो विषय नाही. या बाबत सरकार भूमिका स्पष्ट करेल. मला सांगायचे होते ते मी सांगितले.

आम्ही ग्राहक किंवा शेतकऱ्यांची अडवणूक करीत नाही. शासनाने ही परिस्थिती निर्माण केली आहे. पूर्ण नियंत्रणमुक्ती व सर्वांना समान नियम असावेत, एवढीच आमची मागणी आहे.
-संजय पानसरे, व्यापारी प्रतिनिधी, फळ



राज्यमंत्री खोत बाजारात!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खुल्या बाजार व्यवस्थेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला असल्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, पुणे बाजार पेठेत भाज्यांची विक्री केली. नवनियुक्त कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुंबईतील दादर येथील भाजी मार्केटमध्ये मंगळवारी पहाटे स्वत: भाजी विक्री केली. जुन्नरहून आलेल्या श्रीराम गाढवे (जुन्नर तालुका फार्मर प्रोडिसर कंपनी) यांच्या भाजीपाल्याच्या १० टेम्पोपैकी एकामध्ये उभे राहात खोत यांनी थेट भाजीविक्री केली.

Web Title: The state of the farmers 'no home, no ghat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.