मुख्यमंत्र्यांची स्थिती चक्रव्यूहातील अभिमन्यूसारखी - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: February 18, 2017 08:06 IST2017-02-18T08:06:15+5:302017-02-18T08:06:15+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्र्यांची स्थिती चक्रव्यूहातील अभिमन्यूसारखी - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. शिवसेनेमुळे मुख्यमंत्र्यांना नेतृत्वाची संधी मिळाली असे सांगत त्यांची स्थिती चक्रव्यूहातील अभिमन्यूसारखी आहे, असे टीकास्त्र उद्धव यांनी सोडले आहे. विशेष म्हणजे त्यांना चक्रव्यूहात ढकलून कोंडी करण्याचे काम त्यांच्याच तथाकथित ‘पांडव’ टोळीने केले आहे, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.
काय आहे नेमके सामना संपादकीयमध्ये?
माफ करा, देवेंद्रजी!
चक्रव्यूहात अभिमन्यूची कोंडी व्हावी तशी काहीशी अवस्था (आजी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली दिसते. विशेष म्हणजे त्यांना चक्रव्यूहात ढकलून कोंडी करण्याचे काम त्यांच्याच तथाकथित ‘पांडव’ टोळीने केले आहे. धर्मराज युधिष्ठीर आणि पांडवांना आजही जनतेच्या मनात आदराचे स्थान आहे, परंतु या तथाकथित ‘पांडवां’नी त्या पांडवांचा अपमानच केला आहे.
अर्थात स्वतःस ‘पांडव’ म्हणून घोषित केल्याने कुणी धर्मराज होत नाही. महाराष्ट्राच्या गुन्हेगारी जगतात ‘पांडव टोळी’ कुख्यात होती. त्या टोळीनेही मान खाली घालावी असे कारनामे तुमच्या नेतृत्वाखालील पांडव टोळीचे सुरू आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका महाभारत असल्याची पुडी सोडून मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला व हा धोंडा पुरवण्याचे काम त्यांच्याच पांडव टोळीने करावे याचे आम्हाला आश्चर्य वाटत आहे.
अर्थात लढाया या फक्त हवेत वार करून जिंकता येत नाहीत. त्यात मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच पक्षातील शिवसेनाद्वेषाने पछाडलेल्या मंडळींनी पेटलेल्या रणात सोडले आहे. ‘‘देवेंद्रजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’चा नारा ऐकून मुख्यमंत्री शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी पुढे आले खरे, पण मागे वळून पाहावे तर ज्यांच्या भरवशावर रणात उतरलो तो एकही पुढारी पाठीशी नाही.
कारण शिवसेनेशी दोन हात करणे तर सोडाच, पण शिवसेनेला नुसते अंगावर घेणेही सोपे नाही. याचा अनुभव ते आता घेत आहेत. ‘‘लडनेकू तुम, कपडा संभालनेकू हम’’ असे त्यांच्या बाबतीत झाले आहे व एका भल्या माणसाची ही राजकीय वाताहत पाहून आम्हाला त्यांची कीव येत आहे. पण आता त्यांना भले वगैरे म्हणणेही थोडे जड आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत वगैरे तयार झालेल्या श्री. फडणवीस यांची नागपूर महानगरपालिकेतील कारकीर्द कशी काळवंडलेली व संशयास्पद होती याचा पर्दाफाश आता झाला आहे.
या मुलाचे पाय पाळण्यात दिसले असते तर महाराष्ट्रावर उपकार झाले असते, पण दिल्लीत नरेंद्रांचे व महाराष्ट्रात देवेंद्रांचे खरे पाय दिसले नाहीत व त्याचीच कटू फळे आपण सर्व चाखीत आहोत. नागपूर पालिकेचे घोटाळे सिंचन घोटाळ्यांच्या वर आहेत. ज्या पारदर्शकतेच्या बढाया भाजप मुख्यमंत्री व त्यांचे ‘पांडव’ मारीत आहेत त्यांनी नागपूर महापालिका घोटाळ्यांबाबत नंदलाल समितीने ठेवलेल्या ठपक्यांवर बोलायला हवे. फडणवीस हे महापौर असताना स्थायी समितीच्या सदस्यांनी कंत्राटदारांसोबत परस्पर वाटाघाटी केल्या.
निविदा न मागवताच ‘मर्जी’तल्या ठेकेदार मंडळींना काम देण्यात आले. क्रीडा, साहित्य, औषध खरेदी घोटाळे झाले व एक प्रकारे नागपूर महानगरपालिकेची जनता-तिजोरी सरळ सरळ लुटण्यात आली. त्याचे पुरावे समोर येताच ‘‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये…’’ वगैरे डायलॉगबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांनी नेमलेल्या पोपटांनी सत्य बोलावे, पोपटगिरी करू नये. शिवसेना काचेच्या घरात राहते की दगड-विटांच्या घरात हा विषय नसून तुमचे पुरते वस्त्रहरण झाले आहे, हा विषय आहे! मुख्यमंत्रीपदावर बसलेली व्यक्ती मंत्रालय आणि कामधंदा सोडून पालिका निवडणुकांच्या मतांसाठी स्वतःची इतकी दमछाक करून घेत आहे व हे पाहून त्यांच्याच आतल्या गोटातील ‘पांडव’ एकमेकांना टाळी देत या दमछाकीचा भलताच आनंद घेत आहेत.
त्यांनी मुख्यमंत्र्यांना आगीत ढकलले आहे व ते स्वतः त्यावर आपली पाठ शेकत बसले आहेत. अंतर्कलहांनी जर्जर झालेल्या कोणत्याही सत्ताधारी पक्षात हे असेच घडत असते. सत्तेचा माज डोक्यात गेलेल्यांचे पाय जमिनीवर आणणारी एक शक्ती अदृश्य रूपात वावरत असते. हे लक्षात घेतले तर मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण भाजपच्या अंताची सुरुवात झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा या सर्व काळात इतकी घसरली आहे की, लोकांनी मुख्यमंत्र्यांची विधाने गांभीर्याने घेण्याचे सोडले आहे.
मुख्यमंत्री कामाचे काहीच बोलत नाहीत, लोकांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत, महाराष्ट्राच्या भविष्यावर बोलत नाहीत. ‘सैन्य भरती’ किंवा ‘पोलीस भरती’ होत असते त्या पद्धतीने संघ विचारक ‘भाजप’ गावोगाव टेबले टाकून ‘गुंडा भरती’ करीत आहेत त्यावर बोलत नाहीत; पण शिवसेनेवर मात्र ते बोलत आहेत. ही त्यांच्या मनातील निराशा व सत्ता गमावण्याच्या भीतीची उबळ आहे. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्माला आले नाही. तेव्हा बहुमताचा माजही कोणी दाखवू नये. बहुमताची सरकारेही जेथे पाचोळ्यांप्रमाणे उडून गेली तेथे शंभर टेकू लावलेल्या सरकारची हालत काय विचारता? राज्यात व केंद्रात तुमची सत्ता आहे, म्हणून सरकार टिकविण्याची खासगीतली घोडेबाजाराची भाषा हेच तुमचे राजकीय चारित्र्य असेल तर नैतिकता व साधनशूचितेच्या गप्पा मारणे बंद करा.
खुनी, बलात्कारी, गुंडांना अभय देऊन, भाजपमध्ये त्यांना खुला प्रवेश देऊन तुम्हाला शिवसेनेशी लढायची खुमखुमी असेल तर काँग्रेसप्रमाणे तो प्रयत्न करा आणि स्वतःच आत्महत्येच्या मार्गाने जा. सत्ता आहे व खुर्चीची ऊब आहे म्हणून तोंडास येईल ते बोलणे, बेफाम आरोपांची थुंकी उडवणे यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची अप्रतिष्ठा करीत आहात. वास्तविक तुमच्या हाती सर्व सत्ता व यंत्रणा आहे तरी महाराष्ट्रात बोकाळलेल्या गुंडगिरींचा बंदोबस्त का होत नाही याचा विचार देवेंद्रजी, तुम्ही करायला हवा. महाराष्ट्र आज निराशेच्या व अराजकाच्या गर्तेत आहे.
त्या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी शिवसेनेमुळेच आपल्याला मिळाली, पण त्या संधीचे आपण मातेरे केलेत. स्वतःबरोबर महाराष्ट्राची कोंडी केलीत. तुम्ही गुंडांना ‘क्लीन चिट’ देऊन दुग्धस्नान घालीत असलात तरी देवेंद्रजी, तुम्हाला व तुमच्या पांडवांना आम्ही तरी क्लीन चिट देऊ शकत नाही. नाही, नाही, त्रिवार नाही. माफ करा, देवेंद्रजी. सॉरी, पांडवांचे बॉस आहात तुम्ही. हे राज्य वाल्यांच्या हातात ठेवता येणार नाही. शिवसेनेचे घर काचेचे की काय असेल ते असेल, हिंमत असेल तर मारा दगड. येथील दगडमातीही शिवसेनेचीच आहे. तेथे तुमची ती फालतू नोटाबंदी चालत नाही.