कुरुंदवाडमध्ये १० डिसेंबरपासून राज्य अजिंक्यपद व्हॉलिबॉल स्पर्धा
By Admin | Updated: November 25, 2014 00:08 IST2014-11-25T00:04:28+5:302014-11-25T00:08:27+5:30
तबक उद्यानात ४६ वी महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरुष व महिला व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धा १० ते १४ डिसेंबरअखेर

कुरुंदवाडमध्ये १० डिसेंबरपासून राज्य अजिंक्यपद व्हॉलिबॉल स्पर्धा
कुरुंदवाड : येथील श्री स्पोर्टस् क्लबच्यावतीने व जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनच्या मान्यतेने येथील तबक उद्यानात ४६ वी महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरुष व महिला व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धा १० ते १४ डिसेंबरअखेर होत असल्याची माहिती स्पर्धा संयोजन समिती सचिव डॉ. सुनील चव्हाण व प्रा. बी. डी. सावगावे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
पाच दिवस दिवस-रात्र खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील संपूर्ण ३८ जिल्ह्यांतील महिलांचे ३६, तर पुरुष गटातील ३८ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये सुमारे १२०० खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, पंच व पदाधिकारी या नगरीत येत असून, त्यांच्या निवासाची व भोजनाची संपूर्ण सोेय करण्यात आली आहे.
१९९२ मध्ये हुपरी (ता. हातकणंगले) येथे या स्पर्धा झाल्या होत्या. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात यजमानपद मिळविणारे कुरुंदवाड हे एकमेव शहर आहे. या स्पर्धा येथील तबक उद्यानात पाच सेटवरती दिवस-रात्र विद्युत झोतात होणार आहेत. त्यासाठी तबक उद्यानातील मैदानात बसण्याची सुसज्ज व्यवस्था केली आहे. रात्रीच्या खेळासाठी मैदानात १५० हॅलोजन लावण्यात येणार असून, स्पर्धेचे नेटके संयोजन व्हावे यासाठी श्री स्पोर्टस् क्लबचे खेळाडू गेले दोन महिने झटत आहेत.
ही राज्य अजिंक्य स्पर्धा असून, या स्पर्धेतून चेन्नई येथे होणाऱ्या अखिल भारतीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून संघ निवडला जाणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च येणार असून, क्रीडा रसिक, खेळाडू, विविध संस्थांचे सहकार्य मिळत असल्याचेही सांगितले.
यावेळी स्पर्धा संयोजन समिती स्वागताध्यक्ष व नगराध्यक्ष संजय खोत, क्रीडा संस्थेचे अध्यक्ष जयराम पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे, बांधकाम सभापती वैभव उगळे, नगरसेवक गणपतराव पोमाजे, वसंतराव पाटील, बाळासो देसाई, बाबासो सावगावे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)