‘अटल बंधन’बाबत प्रदेश भाजपा अंधारात
By Admin | Updated: August 17, 2016 04:09 IST2016-08-17T04:09:15+5:302016-08-17T04:09:15+5:30
शिवसेनेच्या ‘शिवबंधन’ला आव्हान देत, मुंबईत भाजपाने हाती घेतलेल्या ‘अटल बंधन’ या कार्यक्रमाबाबत प्रदेश भाजपा पूर्णत: अंधारात असल्याचे आज स्पष्ट झाले

‘अटल बंधन’बाबत प्रदेश भाजपा अंधारात
मुंबई : शिवसेनेच्या ‘शिवबंधन’ला आव्हान देत, मुंबईत भाजपाने हाती घेतलेल्या ‘अटल बंधन’ या कार्यक्रमाबाबत प्रदेश भाजपा पूर्णत: अंधारात असल्याचे आज स्पष्ट झाले.
या कार्यक्रमाची आपल्याला कुठलीही कल्पना नव्हती, या शब्दांत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
अटल बंधन हा भाजपाचा अधिकृत कार्यक्रम नसल्याचे दानवे यांनी सांगितले. मुंबई भाजपा ही एक व्यवस्थेचा भाग आहे. तेथील अध्यक्षांची नियुक्ती हे प्रदेशाध्यक्षच करीत असतात, या शब्दात दानवे यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार यांना आपली जागा दाखवून दिली. भाजपामध्ये उपरे असलेले प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. शेलार यांच्या पुढाकाराने ‘अटल बंधन’ मनगटावर बांधून घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र दिनी केले होते.
भाजपाचा हा अधिकृत कार्यक्रम नसल्याचेच दानवे यांनी एक प्रकारे स्पष्ट केले. राज्यात इतरत्र कोठेही ‘अटल बंधन’चे कार्यक्रम होणार नाहीत. दानवे म्हणाले की, ‘केंद्र सरकारची दोन वर्षांची कामगिरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदेश भाजपाने ठिकठिकाणी ‘विकास पर्व’चे कार्यक्रम घेतले. आता सर्वपक्षीय अशी तिरंगा यात्रा काढली जात आहे. प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत आपण विधिमंडळ अधिवेशनादरम्यान केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. विदर्भाबाबत, तसेच अखंड महाराष्ट्राबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली, तीच आपली भूमिका आहे,’ असे दानवे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)