राज्यात ‘आप’ पुन्हा सक्रिय राजकारणात
By Admin | Updated: December 5, 2014 03:34 IST2014-12-05T03:33:06+5:302014-12-05T03:34:34+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माघार घेतलेली आम आदमी पार्टी आता राज्यात पुन्हा सक्रिय राजकारणात उतरणार आहे

राज्यात ‘आप’ पुन्हा सक्रिय राजकारणात
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माघार घेतलेली आम आदमी पार्टी आता राज्यात पुन्हा सक्रिय राजकारणात उतरणार आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत आपने नव्या राज्य कार्यकारिणीची घोषणा केली. शिवाय लवकरच राज्यभर शेतकरी संवाद यात्रा सुरू करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या भेटी घेणार असल्याचे स्पष्ट केले.
आपचे नवे राज्य संयोजक सुभाष वारे म्हणाले, ‘दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील गावांना भेट देताना आपचे कार्यकर्ते त्याठिकाणी मुक्काम करून लोकांशी संवाद साधतील. तेथील नेमकी परिस्थिती जाणून आत्महत्या करण्यामागील कारणांचा शोध घेतला जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
दलित अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली दक्षता समितीची नियमित बैठक होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
या दक्षता समितीच्या बैठकांसोबतच जिल्हास्तरीय दक्षता समिती स्थापन करण्याची मागणी करणार असल्याचे वारे यांनी सांगितले. आपच्या या राजकिय पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)