शाळा सुरू अन् पाऊसही
By Admin | Updated: June 17, 2014 03:17 IST2014-06-17T03:17:20+5:302014-06-17T03:17:20+5:30
दीड-दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर मुंबई परिसरातील शाळा सोमवारपासून गजबजल्या. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय

शाळा सुरू अन् पाऊसही
मुंबई : दीड-दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर मुंबई परिसरातील शाळा सोमवारपासून गजबजल्या. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबवून मुलांचे अभिनव स्वागत केले. शाळांच्या उपक्रमासोबतच पावसानेही शाळेत जाणाऱ्या मुलांचे स्वागत केल्याने मुलांना शाळेसोबतच पावसाचाही आनंद लुटता आला.
सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेची तयारी रविवारीच पूर्ण केली होती. मुलेही शाळेच्या पहिल्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती. सकाळी पहिल्या सत्रासाठी शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. नवे कपडे, नवी पुस्तके, नवे बूट अशा थाटात मुले शाळेच्या दिशेने जाताना दिसत होती. शाळेच्या पहिल्याच दिवशी पावसाच्या सरींनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
शाळेचा पहिलाच दिवस असल्याने मुंबईतील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम राबवून स्वागत केले. मुलुंड पूर्व येथील लक्ष्मीबाई शाळेत पहिल्या दिवशी हिरमुसल्या डोळ्यांनी आलेल्या बच्चे कंपनीचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत छोटा भीम आणि त्याच्या टीमने केले. रंगीबेरंगी फुग्यांनी सजवलेली शाळा, सोबत मिनी ट्रेन पाहून हिरमुसलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुटले. हसत-खेळत मुलांनी शिकावे, यासाठी विविध कल्पना राबवण्यात आल्या. (प्रतिनिधी)