साताऱ्यात एसटीला थांब्याचा विसर
By Admin | Updated: June 6, 2016 03:25 IST2016-06-06T03:25:35+5:302016-06-06T03:25:35+5:30
नियोजित थांब्यावर न थांबताच बस दुसऱ्या मार्गावरुन गेल्याने मुंबईला येणाऱ्या एका कुटुंबाला थांब्यावरच एसटी बसची तब्बल पाच तास वाट पाहावी लागल्याची विचित्र घटना साताऱ्यात घडली.

साताऱ्यात एसटीला थांब्याचा विसर
मुंबई : नियोजित थांब्यावर न थांबताच बस दुसऱ्या मार्गावरुन गेल्याने मुंबईला येणाऱ्या एका कुटुंबाला थांब्यावरच एसटी बसची तब्बल पाच तास वाट पाहावी लागल्याची विचित्र घटना साताऱ्यात घडली. या कुटुंबामध्ये एका वृद्ध महिलेसह त्यांची सून आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. याविरोधात या कुटुंबाने एसटी महामंडळाने लेखी तक्रार केली आहे.
वरळी पोलीस कॅम्प वसाहतीत सावंत कुटुंबीय राहतात. सुट्टीनिमित्ताने सावंत कुटुंबातील पार्वती शंकर सावंत (६६), दीपा दत्तात्रय सावंत (३६), श्रेयश दत्तात्रय सावंत (१६), निमिशा दत्तात्रय सावंत (१३), साक्षी संजय कदम (१२) हे कराड येथे गेले होते. २ जून रोजी परत येण्यासाठी त्यांनी कराड - परेल या एसटीचे आॅनलाईन तिकीट आरक्षण केले. त्यानुसार दुपारी दोन वाजता कराड येथून ही एसटी सुटणार होती. सावंत कुटूंबिय वेळेच्या अर्धा तास आधीच तेथील अतीत या बस थांब्यावर दाखल झाले. मात्र बराच वेळ होऊनही एसटी न आल्याने त्यांनी जवळील चौकशी कक्षात विचारणा केली. मात्र तेथूनही काहीही माहिती मिळाली नाही. भर उन्हात वृद्ध सासू आणि मुलांना घेऊन कसे जायचे या विचारात दिपा यांनी एसटी विभागाकडे धाव घेतली.
वरळी पोलीस ठाण्यात क्राईम पीआय असलेले पती दत्तात्रय सावंत यांना दीपा यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर दत्तात्रय यांनी दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. कराड एसटी स्टॅण्डच्या क्रमांकावर वारंवार दूरध्वनी केले. मात्र तेथूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सातारा येथील एसटी स्टॅण्डवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बराच वेळ फोन वाजूनही कोणीही प्रतिसाद दिला नसल्याचे सावंत कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर सायंकाळी साडे ॉचारच्या सुमारास सातारा येथील एसटी स्टॅण्डवर झालेल्या संपर्कात, कराड - परेल एसटी सातारा येथून निघून गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या संतापाबरोबर चिंतेत आणखीन भर पडली. अखेर अतीत एसटी थांब्यातील प्रमुख अवघडे यांनी सावंत कुटुंबाला सुरळीत दुसऱ्या बसने पोहचविण्याचे आश्वासन दिले. सायंकाळी सातच्या सातारा- मुंबई मेगा हायवे गाडीमध्ये अतिरिक्त पैसे भरुन त्यांना परतीचा प्रवास करावा लागला. याविरोधात एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांकडे तक्रार करण्यात आली असून त्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सावंत कुटुंबाने केली आहे.