पंढरपूरमध्ये चेंगराचेंगरी; भाविकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 28, 2015 02:29 IST2015-07-28T02:29:18+5:302015-07-28T02:29:18+5:30
चंद्रभागेच्या वाळवंटात एका वारकऱ्याच्या हातातील लोखंडी भगव्या पताकाला विजेचा धक्का बसल्याची खबर पसरताच भाविकांमध्ये घबराट निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली

पंढरपूरमध्ये चेंगराचेंगरी; भाविकाचा मृत्यू
सोलापूर : चंद्रभागेच्या वाळवंटात एका वारकऱ्याच्या हातातील लोखंडी भगव्या पताकाला विजेचा धक्का बसल्याची खबर पसरताच भाविकांमध्ये घबराट निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य २२ जण जखमी झाले. सोमवारी सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान हा प्रकार घडला. अन्य दोन ठिकाणीही चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. दुसरीकडे चंद्रभागा नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला.
चंद्रभागा नदीकाठी वाळवंट परिसरात लाखो भाविक जमले होते. त्यातच एक वारकरी हातात भगवा पताका घेऊन जात असताना त्याला विजेच्या तारांचा स्पर्श झाला. विजेचा धक्का बसल्याचे समजताच वारकऱ्यांमध्ये एकच पळापळ सुरू झाली. यावेळी सत्यभामा प्रकाश नासरे (५५, रा. बोपापूर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) हिचा मृत्यू झाला व २२ भाविक जखमी झाले.
भाविकांच्या पवित्र स्नानासाठी चंद्रभागेत पाणी सोडले असून,
यंदा पाणी साठून राहावे यासाठी
नवा बंधाराही बांधण्यात आला
आहे. त्यामुळे चंद्रभागेतील पाणी पुंडलिक मंदिराच्या पायरीच्याही
वर आहे. दुपारी एक दिंडी
पुंडलिक मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी आल्यानंतर झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, त्यात पाण्यात पडून एका सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)