एसटी २५ नवीन एसी बसेस घेणार
By Admin | Updated: June 2, 2014 06:43 IST2014-06-02T06:43:16+5:302014-06-02T06:43:16+5:30
येत्या काही महिन्यांत २५ नवीन एसी बसेस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

एसटी २५ नवीन एसी बसेस घेणार
मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या एसी बसेसची दुरवस्था झालेली असताना आणि त्यात सुधारणा न करताच प्रवाशांच्या दिमतीला दिल्या जात असतानाच येत्या काही महिन्यांत २५ नवीन एसी बसेस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटी महामंडळाने रविवारी ६६ वा वर्धापन दिन साजरा केला. या वर्धापन दिनानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. एसटीच्या ताफ्यात सध्याच्या घडीला ११0 एसी बसेस आहेत. यातील २५ बसेसची तीन वर्षांची मुदत असून, ती कधीच संपली आहे. या बसचे कंत्राट ज्यांच्याकडे आहे, त्या कंत्राटदारांना त्यांचे कंत्राट वाढवून मिळत नव्हते. त्यामुळे त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत या २५ बसेस वार्यावर सोडण्याचे काम कंत्राटदारांकडून करण्यात आले आणि या बसेसची अवस्था खूपच बिकट झाली. या बसमध्ये दुरुस्ती आणि बदल करून त्या पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेत त्याच कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महामंडळाकडून याव्यतिरिक्त १0 नवीन एसी बसेस घेतल्या जाणार होत्या. हा निर्णयही मागे पडला. रविवारी एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे, एसटी व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेले व्ही. एन. मोरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एसी व्होल्वो बसची स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येते. मात्र आम्ही याचा आढावा घेतला असून, त्यात सुधारणा केल्या आहेत. तसेच ज्या कंत्राटदारांकडे या बसेसचे काम आहे त्यांनाही तशा सूचना केल्या आहेत. हे सांगतानाच राज्य शासनाकडून थकबाकी मिळाल्यास येत्या काही महिन्यांत आणखी २५ नवीन एसी बसेस विकत घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र या बसेस कधी ताफ्यात येतील, हे काहीच सांगू शकले नाहीत. सध्या ताफ्यात असलेल्या एसी बसचे कंत्राट हे एक वर्ष आणखी वाढवल्याने नवीन एसी बसेसची घोषणा ही फक्त घोषणाच राहील की त्याची अंमलबजावणी होईल, हे पाहण्यासारखे असेल. प्रसारमाध्यमे टार्गेट एसटीच्या वर्धापन दिनात या वेळी प्रसारमाध्यमांना एसटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडून टार्गेट करण्यात आले. परदेश दौरा, एसी बसेसची नादुरुस्ती याबद्दलच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्याने आपला रोष या वेळी पत्रकारांवर काढण्यात आला. तब्बल दीड तास चाललेल्या कार्यक्रमात आणि त्यानंतर एक तास झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांवर फक्त टीकाच करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पत्रकारांना बोलावून त्यांच्यावर टीका करण्यात आल्याने पत्रकारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.