एसटी करणार सेवांचे मार्केटिंग

By Admin | Updated: April 7, 2015 04:14 IST2015-04-07T04:14:33+5:302015-04-07T04:14:33+5:30

खासगी वाहतुकीची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे खेचण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विविध सेवांचे ‘मार्केटिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ST services marketing | एसटी करणार सेवांचे मार्केटिंग

एसटी करणार सेवांचे मार्केटिंग

पुणे : खासगी वाहतुकीची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे खेचण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विविध सेवांचे ‘मार्केटिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मार्केटिंग’चे धोरण निश्चित करण्यासाठी एसटीमार्फत एका खासगी एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे. त्यानुसार एसटीच्या विविध सेवांचे ‘मार्केटिंग’ तसेच ‘बँडिंग’साठी प्रयत्न केले जातील.
दरवर्षी एसटीची सुमारे ७ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते. मात्र मागील काही वर्षांपासून खासगी वाहतूक सेवेमुळे एसटीच्या सेवेवर परिणाम होऊ लागला आहे. खासगी बससह इतर वाहनांशी एसटीला तीव्र स्पर्धा करावी लागत आहे. त्यातही योग्य मार्केटिंगअभावी एसटी पिछाडीवरच पडत आहे. साहजिकच तोटा वाढत चालल्याने प्रवाशांना अधिक चांगल्याप्रकारे सेवा देण्यास कमी पडत आहे. सध्या एसटीमार्फत प्रवाशांसाठी अनेक योजना, उपक्रम राबविले जातात. मात्र, त्याची माहिती व्यवस्थितपणे प्रवाशांपर्यंत पोहचत नाही. ‘लाल डब्बा’ म्हणून एसटीची सर्वसामान्यांच्या मनात प्रतिमा आहे. त्यामुळे यासर्व बाबींचा विचार करून एसटीने मागील वर्षी स्वतंत्र ‘प्लॅनिंग व मार्केटिंग’ विभाग सुरू केला.
एसटीकडे बघण्याचा प्रवाशांचा दृष्टीकोन बदलावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.संबंधित एजन्सी एसटीचे बँडिंग, बोधचिन्ह, बोधवाक्य, रंगसंगती तसेच इतर मार्केटिंगबाबतचा अभ्यास करेल, असे ‘लोकमत’शी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: ST services marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.