एसटी भरतीचे अर्ज आजपासून भरता येणार
By Admin | Updated: January 12, 2017 04:11 IST2017-01-12T04:11:19+5:302017-01-12T04:11:19+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सहायक (कनिष्ठ) या पदाच्या वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ केली आहे.

एसटी भरतीचे अर्ज आजपासून भरता येणार
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सहायक (कनिष्ठ) या पदाच्या वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ केली आहे. त्यानुसार वयवर्षे ३८ असलेल्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. जाहिरातीमध्ये ही मर्यादा ३३ वर्षे देण्यात आली होती. दरम्यान, विविध पदांसाठी इच्छुकांना गुरूवार (दि. १२) पासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
एसटी महामंडळाने नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच सुमारे १४ हजार जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. चालक, वाहकाच्या सुमारे ८ हजार, लिपिकाच्या सुमारे २५००, सहायकच्या ३३०० तर पर्यवेक्षकीय दर्जाची ४८३ पदे भरली जाणार आहेत. याबाबतची आॅनलाईन भरती प्रक्रिया गुरूवारपासून सुरू होत आहे. या प्रक्रियेमध्ये सहायक (कनिष्ठ)मधील मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, आॅटो इलेक्ट्रीशियन अशी विविध पदे भरली जाणार आहेत. अर्ज भरण्याची मुदत ३ फेब्रुवारीपर्यंत असून ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान आॅनलाईन दुरुस्ती करता येणार आहे. नोंदणीनंतर दि. १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत आॅनलाईन शुल्क भरावे लागेल. तसेच रोखीनेही शुल्क भरता येणार असून त्यासाठी १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी ही मुदत देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)