एसटीत प्रवाशांची मोबाईलवर होणार करमणूक
By Admin | Updated: May 6, 2015 03:59 IST2015-05-06T03:59:50+5:302015-05-06T03:59:50+5:30
५ हजार गाणी, ५0 चित्रपट आणि ५0 मालिका... हा आकडा आहे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या जाणाऱ्या करमणुकीचा.

एसटीत प्रवाशांची मोबाईलवर होणार करमणूक
सुशांत मोरे, मुंबई
५ हजार गाणी, ५0 चित्रपट आणि ५0 मालिका... हा आकडा आहे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या जाणाऱ्या करमणुकीचा. प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने प्रवासात मोबाइलवर मोफत करमणूक उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर महामंडळाकडून कामही सुरू आहे.
खासगी बस कंपन्यांकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कमी भाडे आकारणी करतानाच अनेक सोयीसुविधा बसमध्ये दिल्या जात आहेत. त्यामुळे महागड्या एसटीकडे जाण्यापेक्षा प्रवासी खासगी बसकडेही वळताना दिसतात. त्यामुळे प्रवासी टिकविण्यासाठी महामंडळाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. नवीन आणि आरामदायी बसेस आणण्याबरोबरच प्रवाशांना बसमध्येच आणखी काही सुविधा देता येईल का याची चाचपणी केली जात आहे. सध्या स्मार्ट फोनचा काळ असून अनेक प्रवाशांच्या हातात नवनवीन फोन पाहण्यास मिळतात. मात्र स्मार्ट फोन सोबत असूनही एसटीतून लांब पल्ल्याचा प्रवास करताना अनेक प्रवाशांचा प्रवास कंटाळवाणाच होतो.
एकूणच प्रवाशांचा हा कंटाळा घालविण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासातच प्रवाशांची करमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मोबाइलमधील हॉटस्पॉट (अॅप) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. एसटीच्या बसमध्ये सेट टॉप बॉक्ससारखे यंत्र बसविण्यात येणार आहे.
अशी असेल नवी योजना
> हॉटस्पॉट हे अॅप असून, ते प्रवाशांना स्मार्ट फोनवर मोफत उपलब्ध आहे.
> यामुळे प्रवाशांना निवडक चित्रपट, मालिका व गाणी बघता येतील.
> यासाठी सेवा पुरवठादाराची गरज नसल्याने एसटीला कुठलाही करार करावा लागणार नाही. तसेच त्यांना मोठा खर्चही येणार नाही. एसटीच्या सर्व बसेसमध्ये ही सेवा टप्प्याटप्प्याने बसविण्यात येईल.
> पाच हजार गाणी, ५0 चित्रपट, ५0 मालिका, चित्रपट तसेच मालिकांतील विनोदी दृश्य असतील. प्रवाशांना करताना हॉटस्पॉट यंत्रणेद्वारे प्रवासी या करमणुकीचा लाभ उठवतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले. ही सेवा प्रवाशांना मोफत उपलब्ध होईल. येत्या चार ते पाच महिन्यांत करमणुकीची सुविधा एसटीत उपलब्ध होईल, असेही सांगितले.