एसटीच्या प्रवाशांमध्ये ११ कोटींची घट
By Admin | Updated: July 4, 2015 03:30 IST2015-07-04T03:30:52+5:302015-07-04T03:30:52+5:30
गेल्या काही महिन्यांपासून प्रवासी आणि उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा तसेच योजना आणण्याचा खटाटोप एसटी महामंडळाकडून सुरू आहे.
एसटीच्या प्रवाशांमध्ये ११ कोटींची घट
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून प्रवासी आणि उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा तसेच योजना आणण्याचा खटाटोप एसटी महामंडळाकडून सुरू आहे. असे असूनही गेल्या वर्षभरात एसटीचे तब्बल ११ कोटी प्रवासी कमी झाल्याचे समोर आले आहे.
‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटीची गेल्या काही वर्षांत आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. अनेक कर, टोल, खर्च तसेच कर्मचाऱ्यांचा वाढलेला पगार यामुळे आर्थिक घडी बसवण्यास एसटीला बराच खटाटोप करावा लागत आहे. त्यातच प्रवासी आणि उत्पन्न कमी झाल्याचीही भर पडल्याने महामंडळाच्या कारभाराला मोठा फटका बसत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. २0१३-१४ मध्ये २५६ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. हाच प्रवास २0१४-१५ मध्ये फक्त २४६ कोटी प्रवाशांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. हे पाहता २0१३-१४ मध्ये दररोज ७0 ते ७१ लाखांच्या दरम्यान प्रवाशांची वाहतूक झाली होती. हीच आकडेवारी २0१४-१५ मध्ये दररोज ६७ ते ६८ लाखांच्या दरम्यान झाल्याचे सांगण्यात आले. प्रवासी कमी होण्यासाठी वाढलेले भाडे, गाड्यांची स्थिती आणि अवैध वाहतूक कारणीभूत असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे. ग्रामीण भागात तर आगार किंवा स्थानकात येऊनच एसटीच्या प्रवाशांना अवैध वाहतूक करणारे चालक कमी भाड्याचे आमिष दाखवतात आणि प्रवासी घेऊन जातात. या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारकडून ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही.
अवैध वाहतूक राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच महामंडळाला फटका बसत असून, प्रवासी कमी होण्यामागील हेच कारण आहे. तरीही प्रवासी वाढवण्यावर भर देत असून त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. - संजय खंदारे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ