एसटीची दुचाकीला धडक, एक ठार

By Admin | Updated: June 6, 2016 03:26 IST2016-06-06T03:26:06+5:302016-06-06T03:26:06+5:30

बसवरील नियंत्रण सुटतानाच पुढे असणारी दुचाकीही न दिसल्याने एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका सहप्रवाशाचा मृत्यू तर दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली

ST hits two-wheelers, one killed | एसटीची दुचाकीला धडक, एक ठार

एसटीची दुचाकीला धडक, एक ठार

मुंबई : बसवरील नियंत्रण सुटतानाच पुढे असणारी दुचाकीही न दिसल्याने एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका सहप्रवाशाचा मृत्यू तर दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. दादर पुर्वेकडील जगन्नाथ शंकरशेठर पुलावर झालेल्या या अपघातानंतर त्वरीत अन्य तीन वाहनांनीही एसटीला मागून धडक दिली. या घटनेत एसटी बस चालकाविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटीच्या डौली-परळ बस सेवेवर चालक सुरेश शिंदे हे कार्यरत होते. ही बस रात्री साडे अकराच्या सुमारास दादर पुर्वेच्या जगन्नाथ शंकर शेठ पुलावरुन जात होती. बस चालवत असतानाच नियंत्रण ठेवता न आल्याने पुढूनच जाणाऱ्या दुचाकीस्वाराला बसने धडक दिली. ही धडक देताच दुचाकीस्वार दुबेर शेख (२४) हा जखमी झाला. तर अफजल शेख (४५) हे ठार झाले. धडक लागून बस थांबताच मागून येणाऱ्या स्वीफ्ट कारने बसला धडक दिली आणि त्यामागोमाग अन्य दोन काळ्या-पिवळ्या टॅक्सीनेही धडक दिली. या घटनेनंतर उपस्थित अन्य वाहनांच्या चालकांनी एसटीचे चालक शिंदे यांना पकडले आणि पोलिसांना बोलावून त्यांच्या हवाली केले. माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. मुंबईत पावसाने थोडा शिडकावा केल्यानंतर बससमोरील वाहने दिसली नसल्यानेच अपघात घडल्याची माहीती चालकाने पोलिसांना दिली असल्याचे माटुंगा पोलिसांकडून सांगण्यात आले. परंतु दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्षक एसटी महामंडळाकडून काढण्यात आला आहे. मात्र अधिक तपास केला जात असल्याचे माटुंगा पोलिसांनी सांगितले. अपघातातील मृत अफजल शेख हे भायखळातील जनता सेवक सोसायटीत राहात होते. तर जखमी दुबेर शेख हे एच.एम.अन्सारी मार्गावरील पत्रा चाळ येथे राहातात. (प्रतिनिधी)

Web Title: ST hits two-wheelers, one killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.