आता एसटीचे ‘कुटुंब सवलत कार्ड’
By Admin | Updated: September 8, 2014 03:06 IST2014-09-08T03:06:29+5:302014-09-08T03:06:29+5:30
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून नवनविन प्रयोग अणि बदल घडविले जात आहेत. याच बदलाचा एक भाग म्हणून एसटी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या वार्षिक सवलत कार्ड योजनेत बदल करण्यात आला आहे

आता एसटीचे ‘कुटुंब सवलत कार्ड’
मुंबई : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून नवनविन प्रयोग अणि बदल घडविले जात आहेत. याच बदलाचा एक भाग म्हणून एसटी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या वार्षिक सवलत कार्ड योजनेत बदल करण्यात आला आहे. पूर्वी एका प्रवाशाला देण्यात येणाऱ्या या सवलतीत आता या प्रवाशासह कुटुंबातील अन्य तीन प्रवाशांनाही सामावून घेता येणार आहे. या एका कार्डासाठी मोजाव्या लागणाऱ्या शुल्कात ३00 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे वार्षिक सवलत कार्ड योजना शिवनेरीतही एका प्रवाशामागे सुरु करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाकडून साध्या बस सेवांसाठी वार्षिक सवलत कार्ड योजना प्रवाशांसाटी सुरु आहे. पूर्वी एका प्रवाशामागे २00 रुपये या कार्डसाठी मोजावे लागत होते. या कार्डमुळे त्या प्रवाशाला प्रवासात १0 टक्के सूट दिली जाते. मात्र आता या योजनेत प्रवासी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून बदल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. आता एका प्रवाशाबरोबरच त्याच्या कुटूंबातील अन्य तीन जणांना या सवलतीत सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २00 रुपयांऐवजी ५00 रुपये मोजावे लागतील आणि प्रवासात दहा टक्के सूट मिळणार आहे. त्याचबरोबर या कार्डाच्या नूतनीकरणाही बदल करण्यात आला असून पूर्वी २00 रुपये नुतनीकरणास लागत असतानाच आता पहिल्या नुतनीकरणासाठी १८0 रुपये, दुसऱ्या नुतनीकरणासाठी १६0 तर तीसऱ्या नुतनीकरणासाठी १५0 रुपये लागतील. हे वार्षिक सवलत कार्ड योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून विमा कवचही देण्यात येते.
यात बदल करताना आता १ लाख रुपयांऐवजी त्याची रक्कम वाढवून दीड लाख इतकी करण्यात आली आहे. तर नुतनीकरण करणाऱ्या प्रवाशासाठी २ लाख रुपयांचे विमा कवच दिले जाणार आहे.