एसटी कर्मचारी यंदा बोनसविना
By Admin | Updated: October 31, 2015 01:50 IST2015-10-31T01:50:10+5:302015-10-31T01:50:10+5:30
एसटी महामंडळ हे तोट्यात असून, कामगारांना यंदा १५ हजार रुपये दिवाळी भेट किवा सानुग्रह अनुदान मिळणार नाही, असे स्पष्टपणे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

एसटी कर्मचारी यंदा बोनसविना
मुंबई : एसटी महामंडळ हे तोट्यात असून, कामगारांना यंदा १५ हजार रुपये दिवाळी भेट किवा सानुग्रह अनुदान मिळणार नाही, असे स्पष्टपणे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परिवहन मंत्री आणि एसटीच्या कामगार संघटनांची शुक्रवारी अनेक मुद्द्यांवर बैठक झाली. या बैठकीत सर्व एसटी कामगारांना दिवाळी भेट (बोनस) मिळावी, अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली होती. त्या वेळी रावते यांनी एसटीची सद्य:परिस्थती महामंडळासमोर मांडली.
महानगरपालिका, बेस्ट, राज्य विद्युत महामंडळ व रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दिवाळी भेट म्हणून काही रक्कम अदा केली जाते. यापूर्वी एसटीच्या कामगारांना छोटीशी रक्कम म्हणून सानुग्रह अनुदान स्वरूपात दिवाळी भेट देण्यात आली आहे. यंदा सरसकट सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून १५ हजार रुपये रक्कम देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून आणि दिवाळी भेट म्हणून १० हजार रुपये देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून एसटी प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून शुक्रवारी अमान्य करण्यात आली. परिवहन मंत्री आणि मान्यताप्राप्त असलेली महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना यांच्यात एक बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन आणि कास्ट्राईब संघटनाही उपस्थित होत्या. भारमान वाढविण्यासाठी संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना त्यांनी सांगितले.
एसटी दिवाळी भेट
२00८-२0१२ आणि २0१२-२0१६ या कामगार करारांनुसार सानुग्रह अनुदानास पात्र ठरतील, असे मूळ वेतन असलेले कामगार एसटीत फारच कमी आहेत. त्यामुळे ृएसटीच्या सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात यावी, अशी मागणी मान्यताप्राप्त युनियनकडून केली होती. अशाच प्रकारची मागणी अन्य कामगार संघटनांनीही केली आहे.