एसटी कर्मचा-यांची नमाज सवलत अबाधित
By Admin | Updated: January 13, 2015 02:58 IST2015-01-13T02:58:36+5:302015-01-13T02:58:36+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी महामंडळ) मुस्लीम कर्मचाऱ्यांना दर शुक्रवारी दुपारी १ ते २ या वेळात नमाज पढण्यासाठी अनेक वर्षे दिली

एसटी कर्मचा-यांची नमाज सवलत अबाधित
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी महामंडळ) मुस्लीम कर्मचाऱ्यांना दर शुक्रवारी दुपारी १ ते २ या वेळात नमाज पढण्यासाठी अनेक वर्षे दिली जाणारी सवलत बंद न करण्याच्या औद्योगिक न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याने कर्मचाऱ्यांची ही सवलत यापुढेही अबाधित राहणार आहे.
एसटी कामगार संघटनेने १९९६ मध्ये दिलेल्या निवेदनानंतर मुस्लीम कर्मचाऱ्यांना दर शुक्रवारी दुपारी नमाजासाठी एक तासाची सुटी देण्यात येत होती. परंतु महामंडळाच्या वर्धा विभाग नियंत्रकांनी ही सवलत बंद केल्याने कामगार संघटनेने त्याविरुद्ध नागपूर येथील औद्योगिक न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानेही मुस्लीम कर्मचाऱ्यांना अशी सवलत देण्याचा निकाल दिला होता. ते पाहता अनेक वर्षे सुरू असलेली ही सवलत बंद करणे ही महामंडळाने अवलंबिलेली अनुचित कामगार प्रथा आहे, असे नमूद करून औद्योगिक न्यायालयाने ही सवलत सुरू ठेवण्याचा आदेश ४ फेब्रुवारी २००४ रोजी एसटी महामंडळास दिला होता. महामंडळाने नागपूर खंडपीठात केलेली रिट याचिका सोमवारी निकाली काढताना न्या. आर. के. देशपांडे यांनी नमूद केले की, या याचिकेवर गेल्या १० वर्षांत या न्यायालयाने अंतरिम आदेश दिलेला नाही. नमाजासाठी दिली जाणारी ही सवलत यापुढेही सुरू ठेवण्याच्या आदेशत हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण दिसत नाही. (विशेष प्रतिनिधी)