एसटीची बस आता असणार स्टीलची
By Admin | Updated: February 10, 2015 02:45 IST2015-02-10T02:45:56+5:302015-02-10T02:45:56+5:30
‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाने प्रवाशांना यापुढे आणखी चांगल्या दर्जाची सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीची बस आता असणार स्टीलची
सुशांत मोरे, मुंबई
‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणा-या एसटी महामंडळाने प्रवाशांना यापुढे आणखी चांगल्या दर्जाची सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रथम अपघात कमी होण्याबरोबरच अपघातात मृत्यू आणि जखमींचे प्रमाण कसे कमी होईल यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी महामंडळाने एसटी बसची सध्याची असलेली अॅल्युमिनियमची बॉडी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अॅल्युमिनियमऐवजी एसटी बसेसची संपूर्ण बांधणी स्टीलची केली जाणार असून, त्यावर महामंडळाने कामही सुरू केले आहे.
एसटीचे अपघात कमी करण्यासाठी महामंडळाकडून नेहमीच काहीना काही प्रयत्न केले जातात. चालकांना पुन:प्रशिक्षणाबरोबरच त्यांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी समुपदेशकांच्या संख्येत वाढही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु एवढे करूनही अपघात मात्र कमी होताना दिसत नाहीत. महामंडळाच्या बस अपघाताची आकडेवारी पाहिली असता २0१२-१३मध्ये एसटीचे ३ हजार ८0 अपघात झाले होते. यामध्ये ४५0 जणांचा मृत्यू झाला होता. तर २0१३-१४मध्ये अपघात आणि त्याचबरोबर बळींचीही संख्या वाढल्याचे दिसून येते. २0१३-१४मध्ये ३ हजार १५0 अपघात झाले असून, ५१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दोन्ही आर्थिक वर्षांत जखमींचेही प्रमाण जास्तच आहे. यावर महामंडळाकडून केलेल्या अभ्यासात एसटी बसची बॉडी अॅल्युमिनियमची असून, अपघात झाल्यास या बॉडीमुळे प्रवाशांचे प्राण वाचत नाहीत आणि प्रवासी गंभीर जखमीही होतात. त्यामुळे एसटी बसची संपूर्ण बॉडीच बदलण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, अॅल्युमिनियमऐवजी यापुढे स्टीलच्या बॉडीचा वापर करून बसची बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम पाच हिरकणी बसेसमध्ये हा बदल केला जाणार असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत स्टीलची बॉडी असलेल्या बसेस ताफ्यात दाखल होतील.