एसआरपी जवानांना मिळणार ३० सुट्ट्यांचे वेतन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 06:22 IST2019-07-08T06:22:29+5:302019-07-08T06:22:33+5:30
मोबदला देण्याबाबत गृह विभागाला प्रस्ताव सादर : दीर्घ कालावधीच्या बंदोबस्तामुळे साप्ताहिक सुट्टी घेणे अशक्य

एसआरपी जवानांना मिळणार ३० सुट्ट्यांचे वेतन!
जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपी) कार्यरत असलेल्या २० हजारांवर जवानांसाठी खूशखबर आहे. नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी ५-५ महिने ‘आॅन ड्युटी’ तैनात असल्याने बुडणाऱ्या सर्व साप्ताहिक सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना त्याचे वेतन मिळणार आहे. सध्या दिल्या जाणाºया आठ सुट्ट्यांच्या वेतनाऐवजी विशेष बाब म्हणून त्याची मर्यादा ३० दिवसांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
एसआरपीने सादर केलेला प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडून मान्यतेसाठी मंत्रालयात पाठविला आहे. पोलिसांनी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्यांना एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय राज्यात गेल्या तीन वर्षांपासून लागू आहे. मात्र त्यासाठी एका कॅलेंडर वर्षात जास्तीत जास्त ८ दिवसांची मर्यादा आहे. एसआरपी जवानांना मात्र बंदोबस्तामुळे दरवर्षी ३०-३५ साप्ताहिक सुट्ट्यांना मुकावे लागते. त्यामुळे हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास जवानांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्टÑ पोलीस दलाच्या अखत्यारीत एसआरपी हा स्वतंत्र विभाग आहे. महापूर, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी स्थानिकांच्या मदतीसाठी त्यांना पाठविले जाते. तसेच नक्षलग्रस्त भाग, घातपाती घटना, निवडणुका व अन्य महत्त्वाच्या कामावेळी राज्यभरातील विविध जिल्ह्यांत आवश्यकतेनुसार बंदोबस्तासाठी पाचारण केले जाते. प्रसंगी काही वेळा शेजारील राज्यातही बंदोबस्तासाठी पाठविले जाते. त्यासाठी १६ बटालियनअंतर्गत (तुकडी) एकूण २० हजारांहून अधिक जवानांची कुमक राज्यभरात विविध ठिकाणी कार्यरत आहे. दर दोन वर्षांनी प्रत्येक बटालियनला नक्षलग्रस्त भागात पाच महिन्यांसाठी पाठविले जाते. तर अन्य ठिकाणच्या बंदोबस्तासाठी किमान दोन महिने तैनात राहावे लागते. या कालावधीत त्यांना साप्ताहिक सुट्टीवर पाणी सोडावे लागते. मात्र सरकारच्या नियमानुसार केवळ ८ दिवसांच्या सुट्टीचा पगार मिळत असल्याने त्यांच्या अन्य सुट्ट्यांचे वेतन किंवा बदली सुट्टी दिली जात नव्हती. त्याबाबत जवानांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पोलिसांच्या राज्यस्तरीय वृंद परिषदेतही हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याबाबत पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एसआरपीच्या प्रमुख अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांना त्यासंबंधी प्रस्ताव बनविण्याची सूचना केली होती. त्यानुसार त्यांनी एसआरपी जवानांना वर्षाला ३० साप्ताहिक सुट्ट्यांचा मोबदला दिला जावा, असा प्रस्ताव ३ मे रोजी महासंचालक कार्यालयाला पाठविला. आता तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.
आदेश काय सांगतो?
राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी पोलिसांना साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्या एक दिवसाचे वेतन देण्याचा आदेश लागू केला आहे. परंतु त्याअंतर्गत एका वर्षात जास्तीत जास्त ८ साप्ताहिक सुट्ट्यांचे वेतन देण्याची मर्यादा आहे. एसआरपीच्या जवानांना मात्र ड्युटीमुळे वर्षाला किमान २० ते ३० साप्ताहिक सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागते.
राज्यभरात १३ बटालियन
एसआरपीच्या मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभरात एकूण १३ बटालियन आहेत, तर ३ आयआरबीच्या कंपन्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये साधारण बाराशे ते तेराशे जवानांचा समावेश असतो.