पुण्याचे शांतीदूत सायकलवरून श्रीलंकेला
By Admin | Updated: October 26, 2014 22:37 IST2014-10-26T21:29:49+5:302014-10-26T22:37:07+5:30
‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा’ हा संदेश देत त्या तिघांनी उपक्रम राबविला आहे.

पुण्याचे शांतीदूत सायकलवरून श्रीलंकेला
शिरवळ : आजच्या युगात माणुसकी जोपासणे किती गरजेचे आहे. शांततामय जीवन जगणे किती फायद्याचे आहे. त्याचबरोबर निसर्गाला वाचविणेही तितकेच गरजेचे आहे. हा संदेश जगाला देण्यासाठी पुण्यातील त्रिमूर्ती शांतीदूत बनले आहेत. त्यांनी पुणे ते कोलंबो (श्रीलंका) सायकल प्रवास सुरू केला आहे. त्यांचे स्वागत शिरवळमध्ये उत्साहात करण्यात आले.
पुणे येथील व्यवसायने चार्टड अकाउटंट असलेले श्रीरंग इथापे, कलाकार राज खेडेकर, शिक्षक राजेंद्र धायुगडे हे ‘शांतता व पर्यावरण वाचवा’ संदेश देत सायकल प्रवास सुरू केला आहे. हे तिघेही त्यांच्या त्याच्या क्षेत्रात स्थिरावलेले आहे. मात्र, सामाजिक व पर्यावरणप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. निसर्गाचे मानवाशी असणारे नाते कशा प्रकारे दृढ करता येईल, यासाठी ‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा’ हा संदेश देत त्या तिघांनी उपक्रम राबविला आहे. त्यांनी आजवर गोवा, अहमदाबाद, हिमाचल प्रदेश असा सायकलवर प्रवास केला आहे. हाच संदेश घेऊन त्यांनी आता पुणे ते श्रीलंका असा सायकल प्रवास सुरू केला आहे.
श्रीरंग इथापे, राज खेडेकर, राजेंद्र धायगुडे यांचे रविवारी सातारा जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या शिरवळ शहरात आगमन झाले. त्यांचे फिरोज फरास, हाजी फैय्याज फरास यांनी स्वागत केले. ‘शांतता, समता व बंधुभावाचे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही पुणे ते श्रीलंका असा सायकलप्रवास सुरू केला आहे,’ अशी माहिती श्रीरंग इथापे यांनी दिली. (प्रतिनिधी)