कोपर्डी घटनेबाबत आक्रोश

By Admin | Updated: September 22, 2016 03:02 IST2016-09-22T03:02:57+5:302016-09-22T03:02:57+5:30

नवी मुंबईतील सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित क्रांती मोर्चात महिलावर्ग तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या

Squeaking of Kopardi incident | कोपर्डी घटनेबाबत आक्रोश

कोपर्डी घटनेबाबत आक्रोश

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- रायगड जिल्हा तसेच नवी मुंबईतील सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित क्रांती मोर्चात महिलावर्ग तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. खारघर सेंट्रल पार्क येथून सुरू झालेला या मोर्चाची सांगता बेलापूर येथील कोकणभवन येथे झाली. यादरम्यान सीबीडी बस डेपो परिसरात झालेल्या सभेत कोपर्डी घटनेबाबत उपस्थित विद्यार्थिनींनी आक्रोश व्यक्त केला. महिलांवरील अत्याचार कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित करीत कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली.
कोपर्डी गावातील घटनेचा निषेध करताना माणुसकी आणि शासन अस्तित्वातच नाही, अशी खंत यावेळी विद्यार्थिनींनी व्यक्त केली. राज्यातील सर्वच मुलींना सुरक्षितरीत्या घराबाहेर पडता यावे यासाठी या मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करण्यात आली. कोपर्डी बलात्कार प्रकरणाला दीड महिना उलटूनही पोलीस यंत्रणेकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे आरोपीला जामीन मिळणे सोपे झाले आहे.
कोपर्डीतील स्थानिकांच्या मागणीनुसार अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्यामार्फतच हा खटला चालविण्याची मागणी यावेळी संतप्त महिला व विद्यार्थिनींनी केली. बलात्काराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी यापुढे अशा गुन्ह्यांतील आरोपींना फासावर लटकविले जावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. प्रकरणातील आरोपीची नार्को टेस्ट करून ज्या प्रवृत्तीमुळे हा अमानुष अत्याचार, बलात्कार करण्याची हिंमत आरोपीने केली ती वृत्ती, त्यामागच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी सीवूड्स येथील प्रचिती सावंत या विद्यार्थिनीने यावेळी केली.
>विद्यार्थिनींचा लढा
शालेय शिक्षण पूर्ण होताच प्रवेशासाठी कसरत करावी लागते. नव्वद टक्के गुण मिळूनही डोनेशन भरावे लागते. मग एवढा पैसा आणायचा तरी कुठून, असा सवाल हर्षा साबळे या चौदा वर्षाच्या विद्यार्थिनीने उपस्थित केला. महाविद्यालयीन प्रवेश ते नोकरी हा प्रवास कठीण झाला असून दिवसेंदिवस समाजामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे.

Web Title: Squeaking of Kopardi incident