वर्गाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले
By Admin | Updated: August 5, 2016 01:08 IST2016-08-05T01:08:58+5:302016-08-05T01:08:58+5:30
२ वर्गांच्या स्लॅबचा काही भाग बुधवारी (दि. ३) रात्री कोसळल्याने या वर्गांतील बाकांचे व दरवाजांचे नुकसान झाले आहे.

वर्गाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले
येरवडा : कल्याणीनगरमधील डॉ. मिसेस एरीन एन. नगरवाला हायस्कूलच्या इमारतीमधील २ वर्गांच्या स्लॅबचा काही भाग बुधवारी (दि. ३) रात्री कोसळल्याने या वर्गांतील बाकांचे व दरवाजांचे नुकसान झाले आहे. ही घटना शाळा सुटल्यानंतर रात्रीच्या सुमारास घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
या घटनेची दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ४) पालक व विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती. मात्र, शाळेच्या आवारात पालकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच याबाबत कुठलीही माहिती दिली जात नसल्याने घटनेबाबत गुप्तता बाळगण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून करण्यात येत होता.
पालकांनीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून घटनेबाबत कळवले. विशेष म्हणजे या शाळेकडून पोलिसांनाही माहिती देण्यात आलेली नाही. या घटनेची माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शाळेला सूचना केल्या जातील, असे येरवड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, मनसेचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मोहनराव शिंंदे-सरकार व अच्युतराव मोळावडे यांनी गुरुवारी सायंकाळी माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शाळेची वेळ संपल्याचे सांगून आतमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. दिवसभरात काही पालकांनीही शाळेची पाहणी करण्याची केलेली मागणीही शाळेकडून नाकारण्यात आली. दरम्यान, शाळेने गुरुवारी विद्यार्थ्यांकरवी पालकांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये देखभाल दुरुस्तीच्या तातडीच्या कामासाठी शुक्रवारी (दि. ५) एलकेजी ते सातवीपर्यंतच्या वर्गांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे शुक्रवार तसेच शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या सलग ३ दिवसांमध्ये स्लॅब पडलेल्या इमारतीची दुरुस्ती करण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. याबाबत विद्यालयाच्या कार्यालयीन दूरध्वनीवर, प्राचार्या जस्मिन दलाल यांच्याशी संपर्क साधला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला
नाही. (वार्ताहर)
>‘स्ट्रक्चरल आॅडिट’ची मागणी
मनसेचे मोहनराव शिंंदे-सरकार म्हणाले, की या शाळेची इमारत जुनी झाली आहे. सुदैवाने वर्गात विद्यार्थी नसताना स्लॅब कोसळल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने याबाबत कसलीही तडजोड केली जाऊ नये.
या इमारतीचे पालिकेने स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी आपण आयुक्तांची भेट घेणार आहोत, तसेच यासाठी शाळा प्रशासनाकडेही पाठपुरावा करण्यात येईल. शाळेकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास ‘मनसे स्टाईल’ने शाळेला धडा शिकवला जाईल.