रानात उगवली अळंबी

By Admin | Updated: July 31, 2016 02:28 IST2016-07-31T02:28:10+5:302016-07-31T02:28:10+5:30

पावसाळ्यातील रानभाज्या म्हणजे डोंगरदऱ्यातील लोकांकरिता पर्वणीच.

Sprouts in the woods | रानात उगवली अळंबी

रानात उगवली अळंबी


दासगाव : पावसाळ्यातील रानभाज्या म्हणजे डोंगरदऱ्यातील लोकांकरिता पर्वणीच. अनेक रानभाज्या सध्या आदिवासी बांधवांकडून बाजारात उपलब्ध होत असल्या तरी ग्रामीण भागात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अळंबीला मोठी मागणी आहे. गेल्या दोन दिवसांपासून ऊन पडत असल्याने ग्रामीण भागातील लोक रानावनात फिरून अळंबी गोळा करीत आहेत.
श्रावणाची चाहूल होताच ऊनपावसाच्या खेळात ही अळंबी उगवतात. याला काही ठिकाणी कुत्र्याची छत्री म्हणतात. पावसाच्या खेळात रानात ही अळंबी उगवतात. कृत्रिमरीत्या उत्पादन करण्यात येणाऱ्या अळंबीचे अनेक प्रकार आहेत. मात्र एका विशिष्ट वेळेला आणि ठरावीक काळापुरतेच रानात उगवणाऱ्या अळंबीला मोठी मागणी आहे. नैसर्गिक सत्व आणि जीवनसत्वांनी पुरेपूर असलेली ही अळंबी ग्रामीण भागासह शहरी भागातही चवीने खाल्ली जातात. पांढऱ्याशुभ्र छत्रीच्या आकाराच्या अळंबीमध्ये अनेक प्रकार असले तरी या काळात केवळ दोन दिवसच येणारी ही अळंबी हिरव्यागार गवतात उठून दिसतात. लाल मातीत उगवणारी अळंबी जमवण्याकरिता ग्रामीण भागात मोठी कसरतच असते. ज्या ठिकाणी अळंबी मोठ्या प्रमाणात उगवतात तेथून अळंबी आणण्याकरिता पहाटेपासून लोकांची चढाओढ सुरू असते. पहाटे उठून अनेक जण अळंबीसाठी रानात जातात.
सध्या आदिवासी बांधवांकडून रानभाज्यांचा व्यवसाय सुरू आहे. रानावनात फिरून या गोळा करून शहरात आणल्या जात आहेत. महाडमध्ये देखील आदिवासी महिलांना हा एक रोजगार उपलब्ध झाला आहे. पावसाळ्यातील वातावरणाला साजेशा या रानभाज्या असल्याने शहरातील रासायनिक खतांवर वाढवेल्या भाज्यांपेक्षा या रानभाज्यांना मागणी आहे. अळंबीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण असते. अळंबीच्या पौष्टिक गुणधर्मामुळे अळंबीला अधिक दर आहे. सध्या आदिवासींना अळंबीस किमान ५० ते १०० इतका दर मिळत आहे. कोकणात ही अळंबी केवळ दोनच दिवस मिळत असल्याने खवय्यांकरिता या दोन दिवसातच ही अळंबी बाजारात मिळणार आहेत.

Web Title: Sprouts in the woods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.