सुखावणाऱ्या मान्सूनचा राज्यभरात शिडकावा
By Admin | Updated: June 12, 2017 03:12 IST2017-06-12T03:12:21+5:302017-06-12T03:12:28+5:30
मान्सूनच्या प्रवासाचा वेग वाढत असून, रविवारी त्याने श्रीवर्धन, महाबळेश्वर, सांगली, सातारा आणि विजापूरपर्यंतचा भाग व्यापला आहे.

सुखावणाऱ्या मान्सूनचा राज्यभरात शिडकावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/पुणे : मान्सूनच्या प्रवासाचा वेग वाढत असून, रविवारी त्याने श्रीवर्धन, महाबळेश्वर, सांगली, सातारा आणि विजापूरपर्यंतचा भाग व्यापला आहे. त्यामुळे गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची नोंद झाली.
येत्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी गेल्या काही तासांत मुसळधार पाऊस झाला़ मंडणगड १५०, हर्णे १४०, सावंतवाडी १२०, म्हसळा, रत्नागिरी, श्रीवर्धन १००, कानकोन, गुहागर, कणकवली, संगमेश्वर-देवरूख ९० मिमी; मध्य महाराष्ट्रात जळगाव १४०, महाबळेश्वर, रावेर ६०, बार्शी, पन्हाळा ५०, भुसावळ, इगतपुरी ४० मिमी; मराठवाड्यात सिल्लोड १००, उस्मानाबाद ८०, लोहा ७०, हदगाव ६०, औंढा नागनाथ, भोकरदन, फुलंब्री ५० यासह विदर्भातही काही ठिकाणी पाऊस झाला.