स्थळांच्या पाहणीला वेग!
By Admin | Updated: August 27, 2014 04:14 IST2014-08-27T04:14:07+5:302014-08-27T04:14:07+5:30
पंजाबमधील घुमान येथे होणा:या ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे

स्थळांच्या पाहणीला वेग!
मुंबई : पंजाबमधील घुमान येथे होणा:या ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे आता ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीनेही जोर धरला असून नुकतीच या संदर्भात घुमान येथे बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करत संमेलन स्थळांची पाहणी करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी घुमान येथे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांच्या उपस्थितीत गावकरी, संत नामदेव दरबादर समिती, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सचिव गुरुचरण सिंह बावा, कश्मीर सिंह बरियार, त्रिलोकन सिंह धामी, बलबीर सिंह, सचिव सोनू वेने, जीवन साठे, कुणाल शिंदे या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली.
यंदाच्या साहित्य संमेलनाला साधारण सात हजारहून अधिक साहित्यप्रेमी आणि पंजाबमधील स्थानिक उपस्थित राहतील
असा अंदाज आहे. मात्र त्याची
संख्या अधिक वाढल्यास साहित्यप्रेमींची व्यवस्था घराघरात करु, असा निर्धार या बैठकीत गावकऱ्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आतापासूनच उत्साहाच्या वातावरणता संमेलनाची तयारी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे संत नामदेवांची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्राचा सन्मान करण्याची संधी आहे, असे आम्ही मानतो, असे घुमानचे सरपंच हरबन्स सिंह आणि सुखजिन्द्र सिंह लाली यांनी या बैठकीत सांगितले. यावेळी संमेलन स्थळ, निवास व्यवस्था यांची पाहणी करण्यात आली. संमेलनस्थळावरील व्यवस्था लावल्या जात असून त्यासाठी हा घुमान दौरा केल्याचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सांगितले. (प्रतिनिधी)