राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कोकणात सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना शिंदेगटात फोडाफोडीवरून तणाव निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीमधील नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांना शिवसेना शिंदे गटाशी जवळीक ठेवल्याने शिस्तभंग झाल्याचा ठपका ठेवत भाजपामधून निलंबित करण्यात आलं आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपाचे आठ नगरसेवक असून, या आठ नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांना शिस्तभंगाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी संबंधित नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत.
निलंबित कऱण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, नयना माांजरेकर, अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर आणि चांदणी कांबळी या भाजपाच्या नगरसेवकांचा समावेश आहे. या सर्वांची शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सिंधुदुर्गातील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात असलेला तणाव स्पष्ट झाला आहे.