गुरु शिष्याच्या भेटीची भावपूर्णता

By Admin | Updated: December 25, 2014 00:28 IST2014-12-25T00:28:55+5:302014-12-25T00:28:55+5:30

कुठल्याही शिक्षकासाठी त्याचा विद्यार्थी यशाचे शिखर गाठतो, तेव्हा आनंदाचाच क्षण असतो. आपण घडविलेला विद्यार्थी समाजासाठी प्रामाणिक योगदान देताना पाहून शिक्षकाला कृतकृत्य वाटणे स्वाभाविकच असते.

Spirituality of the visit of the disciple | गुरु शिष्याच्या भेटीची भावपूर्णता

गुरु शिष्याच्या भेटीची भावपूर्णता

एन. के. सर म्हणाले : ‘गुरुदक्षिणा मिळाली’
नागपूर : कुठल्याही शिक्षकासाठी त्याचा विद्यार्थी यशाचे शिखर गाठतो, तेव्हा आनंदाचाच क्षण असतो. आपण घडविलेला विद्यार्थी समाजासाठी प्रामाणिक योगदान देताना पाहून शिक्षकाला कृतकृत्य वाटणे स्वाभाविकच असते. हा त्या शिक्षकाचा निर्विवाद सन्मान असतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. एन. के. देशमुख यांनी घडविलेला विद्यार्थी म्हणजे आताचे गृहराज्यमंत्री (शहर) डॉ. रणजित पाटील. मंत्री झाल्यानंतर डॉ. रणजित पाटील यांना आपल्या गुरुच्या भेटीची आतुरता होती. आज त्यांनी डॉ. देशमुख यांची भेट घेतली. हा एक भावपूर्ण प्रसंग होता. गुरुशिष्याच्या भेटीची भावपूर्णता यावेळी वातावरण व्यापून उरणारी होती.
मंत्री झाल्यावर आपल्या गुरुचा आशीर्वाद घेण्याची त्यांची इच्छा होती पण हिवाळी अधिवेशनाच्या धामधुमीत वेळच मिळाला नाही. ही रुखरुख डॉ. पाटील यांच्या मनात बोचत होती. आज अधिवेशन संपल्यावर राज्यमंत्री डॉ. पाटील लगेच एन. के. सरांच्या घरी गेले. आपल्या शिष्याने मिळविलेले यश पाहून देशमुख सरांना आनंदाने भरून आले आणि साऱ्यांच्याच पापण्या ओलावल्या. यावेळी स्वाभाविकपणे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि वातावरण हळवे झाले.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, ज्यांनी खरोखरीच माझे आयुष्य घडविले, त्या गुरुला भेटण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा हा क्षण मला अपूर्व वाटतो. हा माझ्या आयुष्यातला मोठा आनंद आहे.
आम्ही विद्यार्थी असताना डॉ. देशमुख सरांबद्दल आदरयुक्त भीती होती. आमच्या चालण्यात, वागण्या-बोलण्यातही एन. के. सरांचीच छाप होती. यावेळी एन. के. सर म्हणाले, डॉ. रणजित पाटील हा त्यावेळी माझा आवडता विद्यार्थी होता. अतिशय प्रामाणिक आणि अभ्यासू विद्यार्थी म्हणून नेहमीच तो माझ्या जवळ होता. आपले विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होतात, यासारखा आनंद नाही. आज डॉ. पाटील मंत्री झाले, याचे समाधान वाटते. या भावनिक क्षणी डॉ. पाटील यांचे मित्र डॉ. पिनाक दंदे आवर्जून उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Spirituality of the visit of the disciple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.