नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरात एनएमएमटी इलेक्ट्रिक बसने नियंत्रण गमावले आणि पादचाऱ्यांना धडक दिली, यात सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने, कोणालाही मोठी इजा झाली नाही. याप्रकरणी तुर्भे पोलिसांत बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री ९.०० वाजताच्या सुमारास घडली, असे वृत्तसंस्था पीटीआयने दिले आहे.
बसचालक प्रमोद रमेश कनोजिया (वय, ५२) याच्याविरुद्ध कलम २८०, १२४ (अ) आणि भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तुर्भे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आचासाहेब पाटील यांनी पीटीआयला दिली.
तुर्भे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, बस जास्त वेगाने चालवली जात होती आणि फायझर कंपनी रोड स्ट्रीचजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. या अपघातात सहा जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनाग्रस्त बस ही एनएमएमटीच्या तुर्भे डेपोची आहे. वाहन जप्त करण्यात आले आहे आणि फॉरेन्सिक आणि यांत्रिक तपासणी सुरू आहे.