आत्मसमर्पित नक्षल्यांना घरे देण्याच्या कामाला गती
By Admin | Updated: September 3, 2014 01:13 IST2014-09-03T01:13:15+5:302014-09-03T01:13:15+5:30
नक्षल चळवळीचा पूर्णत: बिमोड करण्यासाठी शासनाने आणखी पुढाकार घेत आता सुधारीत आत्मसमर्पण योजना सुरु केली आहे. नक्षल चळवळ सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येणाऱ्या आत्मसमर्पित

आत्मसमर्पित नक्षल्यांना घरे देण्याच्या कामाला गती
५.५३ हेक्टर जमीन अधिग्रहीत : १७१ भूखंडाचे होणार वितरण
गडचिरोली : नक्षल चळवळीचा पूर्णत: बिमोड करण्यासाठी शासनाने आणखी पुढाकार घेत आता सुधारीत आत्मसमर्पण योजना सुरु केली आहे. नक्षल चळवळ सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येणाऱ्या आत्मसमर्पित नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. ही चळवळ सोडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. त्यासाठी शासनाने ५.५३ हेक्टर जमीन अधिग्रहीत केली असून आत्मसमर्पीत नक्षल्यांसाठी १७१ भूखंड वितरीत करण्यात येणार आहे. या भूखंडावर शासनाकडून मोफत घरकूल बांधून मिळणार आहे. भूखंडाच्या मोजमापाच्या कामास गती आली आहे.
चळवळीत सक्रीय असलेल्या नक्षल्यांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन स्वत:चा विकास करावा. तसेच सुखी जीवन जगावे यासाठी शासनाने २९ आॅगस्ट २००५ पासून नक्षल्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरु केली. या योजनेंतर्गत आत्मसमर्पीतांना ठराविक रक्कम, भूखंड, घरकूल, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड आदी सुविधा देण्यात येत आहे. या व्यापक योजनेकडे नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पण करण्याचा कल वाढला आहे. चळवळीतील अनेक नक्षलवादी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पण करीत आहेत. गत वर्षी २०१३ मध्ये सर्वाधिक ४८ नक्षल सदस्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पीत नक्षली हे नेहमीच चळवळीतील नक्षल्यांचे लक्ष्य असतात. नक्षल्यांकडून त्यांना जीवे मारण्याची भीती असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरालगतच आत्मसमर्पित नक्षल्यांचे पुनर्वसन करण्याचे शासनाचे धोरण आहे. याच उद्देशाने गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून अवघ्या एक किलोमीटर परिसरात शासनाने आत्मसमर्पीत नक्षल्यांच्या भूखंडासाठी १६६/१ (३.५३ हेक्टर) व १६७ (२ हेक्टर) क्रमांकाचे दोन मोठे भूखंड अधिग्रहीत केले आहे. जवळपास १४ एकर क्षेत्रफळ असलेल्या या जमिनीवर आत्मसमर्पीत नक्षल्यांना एकूण १७१ भूखंडाचे वाटप होणार आहे. २००५ पासून आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना प्रत्येकी १ हजार २५० चौ.फूट क्षेत्रफळाचा भूखंड मोफत मिळणार असून त्यावर इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलसुध्दा बांधून मिळणार आहे. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जमिनीचे मोजमाप करणे सुरु झाले आहे. शासनाने हक्काचा निवारा दिल्यामुळे आत्मसमर्पीत नक्षल्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तसेच चळवळीतील इतर नक्षल्यांनीसुध्दा आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलीस व आत्मसमर्पीत नक्षल्यांनीसुध्दा चळवळीत काम करणाऱ्या नक्षलवाद्यांना केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)