अंबाजोगाई तालुक्यात जलसंधारणाच्या चळवळीला गती
By Admin | Updated: June 6, 2016 03:23 IST2016-06-06T03:23:26+5:302016-06-06T03:23:26+5:30
अंबाजोगाई तालुक्यातील ३४ गावांध्ये लोकसहभागातून सिंचनाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर दररोज ५६०० महिला व ग्रामस्थ श्रमदान करतात. यासाठी ६० लाखांपेक्षा जास्त लोकनिधी जमा झाला आहे.

अंबाजोगाई तालुक्यात जलसंधारणाच्या चळवळीला गती
अविनाश मुडेगांवकर, अंबाजोगाई (जि. बीड)
अंबाजोगाई तालुक्यातील ३४ गावांध्ये लोकसहभागातून सिंचनाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर दररोज ५६०० महिला व ग्रामस्थ श्रमदान करतात. यासाठी ६० लाखांपेक्षा जास्त लोकनिधी जमा झाला आहे. जलसंधारणाला लोकचळवळीचे रुप येत असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न सत्यमेव जयतेच्या वॉटर कप स्पर्धेतून साकारण्याच्या मार्गावर आहे.
दुष्काळी स्थितीवर ठोस उपाययोजना आखण्यासाठी ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धा अंबाजोगाईत सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेत तालुक्यातील ३४ गावांनी सहभाग नोंदविला आहे. गावांमध्ये लोकसहभागातून श्रमदान व लोकनिधीच्या माध्यमातून सिंचनाची कामे करायची आहेत. यात वृक्ष लागवड, शोषखड्डे, बांधबंदिस्ती, नाला खोलीकरण व सरळीकरण, विहिरी व इंधन विहिरींचे पुर्नभरण या कामांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. ही कामे २० एप्रिल ते ५ जून या कालावधीत पूर्ण करायची आहेत. जी गावे प्राधान्यक्रम देऊन कामे पूर्ण करतील, त्यातील तीन गावांना ५० लाख, ३० लाख व २० लाख रुपये अशी तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सत्यमेव जयतेच्या वॉटर कप स्पर्धेमुळे ३४ गावांना प्रेरणा मिळाली असून, गावोगावी सिंचनाची कामे सुरू आहेत.
प्रत्येक गावामध्ये दररोज सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत महिला व पुरूष श्रमदानातून कामे करतात. गेल्या महिनाभरापासून या कामांनी गती घेतल्यामुळे अनेक गावांमध्ये बहुतांश कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. लोकसहभागातून व श्रमदानातून सुरू असणाऱ्या या कामांमुळे गावांमध्ये एकजूट निर्माण झाली आहे.