वेग आणि चपळता म्हणजे ‘टेबल टेनिस’
By Admin | Updated: March 22, 2015 01:53 IST2015-03-22T01:53:39+5:302015-03-22T01:53:39+5:30
इनडोअर क्रीडा प्रकारातील वेगवान खेळापैकी एक खेळ म्हणजे ‘टेबल टेनिस’. चपळता, वेगवान हालचाली आणि जबरदस्त नजर हे गुण असतील तर तुम्हाला हा खेळ खेळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

वेग आणि चपळता म्हणजे ‘टेबल टेनिस’
इनडोअर क्रीडा प्रकारातील वेगवान खेळापैकी एक खेळ म्हणजे ‘टेबल टेनिस’. चपळता, वेगवान हालचाली आणि जबरदस्त नजर हे गुण असतील तर तुम्हाला हा खेळ खेळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मुंबईमध्ये शालेय स्तरापासून ते व्यावसायिक गटापर्यंत विविध वयोगटांत टेबल टेनिसचे सामने किंवा स्पर्धा सातत्याने रंगत असतात.
मुंबई शहर टेबल टेनिस संघटना आणि मुंबई उपनगर टेबल टेनिस संघटना अंतर्गत संपूर्ण मुंबईमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन होत असते. जिल्हास्तरीय स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा यामधून अनेक गुणवान खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्यात यशस्वी ठरतात. विशेष म्हणजे मुंबई स्तरावर होणाऱ्या स्पर्धा या चार डिव्हीजनमध्ये होतात. यामध्ये खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार पुढच्या डिव्हीजनमध्ये बढती मिळत जाते.
उदा. डिव्हीजन ‘फोर’मधील अव्वल दोन संघ किंवा खेळाडू हे पुढील मोसमामध्ये डिव्हीजन ‘थ्री’साठी पात्र ठरतात. त्याचवेळी डिव्हीजन ‘थ्री’मधील तळाच्या खेळाडूंना डिव्हीजन ‘फोर’मध्ये खेळावे लागते. यामुळेच प्रत्येक खेळाडू उच्च दर्जाचे टेबल टेनिस खेळण्यासाठी वर्षभर मेहनत घेऊन आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मुंबईकरांची नकळतपणे गुणवत्ता सुधारत जाते.
वयाच्या ७-८ वर्षांपासून ‘टे.टे.’ खेळण्यास सुरुवात करू शकतो. खेळाडूची उंची व त्याची दृष्टी यावरदेखील बरेच काही अवलंबून असते. शालेय स्तरावर अनेक शालेय स्पर्धा आयोजित होत असल्याने लहान वयापासूनच स्पर्धात्मक टेबल टेनिसची सवय होते. १०, १२, १४, आणि १७ वयोगटामध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या खेळाडूंची जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय स्पर्धांसाठी निवड होते. महाविद्यलयीन पातळीवर देखील मुंबई विद्यापीठातर्फे अनेक स्पर्धा विभागानुसार घेतल्या जातात. त्यामुळे नवोदितांना स्पर्धात्मक खेळाचा चांगल्याप्रकारे अनुभव मिळत जातो.
खेळाडू म्हणून संधी...
इतर खेळांप्रमाणे या खेळातदेखील क्लब संस्कृती असल्याने प्रत्येक इच्छुक खेळाडूला टेबल टेनिसमध्ये कारकीर्द करण्याचा मार्ग मिळतो. सातत्याने विविध क्लब्सच्या वतीने आयोजित होणाऱ्या स्पर्धांतून व्यावसायिक स्पर्धांचा अनुभव खेळाडूंना होत असतो. यातूनच अनेक प्रतिभावंत खेळाडू घडत असतात. मुंबईमध्ये वर्षभर प्रत्येक वयोगटाच्या जिल्हस्तरीय स्पर्धांचे आयोजन होते. यातील अव्वल खेळाडू पुढे राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवतात.
नोकरीच्या संधी...
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकल्यावर खेळाडूंची सरकारकडून दखल घेतली जातेच; परंतु त्यासोबतच नोकरीचा मार्ग देखील मोकळा होतो. यामध्ये सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल ते म्हणजे रेल्वेचे. रेल्वे कायमच गुणवान खेळाडूंना संधी देत आल्याने आज बहुतेक खेळांमध्ये रेल्वे अग्रेसर आहे. टेबल टेनिसमध्ये देखील हेच चित्र आहे. त्याशिवाय एलआयसी, आरसीएफ, एअर इंडिया, देना बँक, आरबीआय यांसारख्या अनेक सरकारी व व्यावसायिक संस्था गुणवान व प्रतिभावंत खेळाडूंच्या शोधात असतात.