स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आता शुभ मुहूर्त पाहून!
By Admin | Updated: August 24, 2016 04:40 IST2016-08-24T04:40:00+5:302016-08-24T04:40:00+5:30
कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला मुहूर्त पाहण्याची आपल्याकडे प्रथा आहे.

स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आता शुभ मुहूर्त पाहून!
मुंबई : कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला मुहूर्त पाहण्याची आपल्याकडे प्रथा आहे. दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यासाठीही सरकार आता शुभ मुहूर्त शोधत आहे. दूरसंचार सचिव जे. एस. दीपक यांनीच ही माहिती दिली.
दूरसंचार सचिवांनी सांगितले की, २0 सप्टेंबर रोजी स्पेक्ट्रम लिलाव होणार होता. तथापि, अनेक कंपन्या आणि लोकांचे असे म्हणणे आहे की, १ आॅक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. हा काळ बोली लावण्यासाठी शुभ आहे. लिलावात भाग घेणाऱ्या लोकांना चांगले वाटत असेल आणि स्पेक्ट्रम खरेदीत ते अधिक पैसा देणार असतील, तर सरकार स्पेक्ट्रम लिलावाची तारीख बदलून आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करू शकते. या लिलावातून आवश्यक तेवढा महसूल सरकारला नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
येणारा स्पेक्ट्रम लिलाव हा आजपर्यंतचा सर्वांत मोठा लिलाव असल्याचे मानले जात आहे. स्पेक्ट्रमचे आधार मूल्य जास्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांत त्याबाबत फारसा उत्साह दिसून येत नाही. देशातील तिसरी मोठी दूरसंचार कंपनी आयडियाच्या मुख्य वित्त अधिकाऱ्याने याच महिन्यात सांगितले होते की, दूरसंचार उद्योग आता स्पेक्ट्रमच्या टंचाईकडून अतिरिक्त स्पेक्ट्रमकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या लिलावात कंपन्या आवेशात बोली लावणार नाहीत. आर्थिक आधारावरच निर्णय घेतील.
असे असले, तरी दीपक यांनी स्पेक्ट्रम लिलावाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही मोठ्या संख्येत चांगल्या गुणवत्तेचे स्पेक्ट्रम विक्री करीत आहोत. (लोकमत न्यूज नेटवर्क)