सिकलसेलग्रस्तांसाठी विशेष लसीकरण मोफत असावे
By Admin | Updated: June 20, 2014 01:07 IST2014-06-20T01:07:41+5:302014-06-20T01:07:41+5:30
सिकलसेलग्रस्तांमध्ये प्रतिकार शक्तीचा अभाव असतो. तेव्हा त्यांना लहानपणापासूनच प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या विशेष लसीकरणाची गरज आहे. परंतु हे लसीकरण महागडे आहे. तेव्हा सिकलसेलग्रस्तांसाठी

सिकलसेलग्रस्तांसाठी विशेष लसीकरण मोफत असावे
राज्यस्तरीय सिकलसेल संमेलन : उदय बोधनकर यांचे आवाहन
नागपूर : सिकलसेलग्रस्तांमध्ये प्रतिकार शक्तीचा अभाव असतो. तेव्हा त्यांना लहानपणापासूनच प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या विशेष लसीकरणाची गरज आहे. परंतु हे लसीकरण महागडे आहे. तेव्हा सिकलसेलग्रस्तांसाठी हे विशेष लसीकरण मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, असे आवाहन प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी केले.
जागतिक सिकलसेल दिनानिमित्त सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाच्यावतीने हिंदी मोरभवन सीताबर्डी येथे राज्यस्तरीय सिकलसेल संमेलन आयोजित करण्यात आले होते. एका सिकलसेलग्रस्त मुलीच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. याप्रसंगी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे प्रभारी एम. एस. पिंपळगावकर, डॉ. नवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. बोधनकर यांनी आपल्या भाषणात सिकलसेल आजारावर प्रकाश टाकला. या आजारात औषधोपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. बहुतांश गरीब रुग्ण हा खर्च उचलू शकत नाही. त्यामुळे शासनाने सिकलसेलग्रस्तासाठी मोफत औषधोपचार व्यवस्था केली आहे. परंतु प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या विशेष लसीकरणासाठी मात्र त्यांना ही सुविधा नाही. सिकलसेलग्रस्तांना विशेष लसीकरण आवश्यक असल्याने त्यांना ही सुविधा मोफत देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. पिंपळगावकर यांनी राजीव गांधी योजनेची माहिती दिली. डॉ. नवाडे यांनी शासनाच्या विविध योजना समजावून सांगितल्या. सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी प्रास्ताविक केले. नीळकंठ पांडे यांनी संचालन केले. प्रमोद धनविजय यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)