पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने दोन गटात हिंसाचार उसळला. यवतमधील बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली आणि काही घरांना पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शिवाय, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती कोल्हापूरचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
सुनील फुलारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमधील परिस्थिती आता नियंत्रणात आणि सामान्य झाली आहे. परंतु, हिंसाचारादरम्यान गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन कारच्या खिडक्या फोडल्या गेल्या, एक मोटारसायकलही जाळण्यात आली, गावातील एका बेकरीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एवढेच नाही तर, काही समाजकटंकांनी धार्मिक प्रार्थनास्थळातही तोडफोड केली.
पुढे फुलारी म्हणाले की, "या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या हिंसाचारात सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या गावातील एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत."