महापुरुषांच्या पुस्तकांचे विशेष दालन
By Admin | Updated: April 11, 2015 05:46 IST2015-04-11T05:46:46+5:302015-04-11T05:46:46+5:30
मुंबई विद्यापीठातील पंडित जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे विशेष दालन सुरू करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ
महापुरुषांच्या पुस्तकांचे विशेष दालन
मुंबई : मुंबई विद्यापीठातील पंडित जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे विशेष दालन सुरू करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांनी गुरुवारी केली. महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फुले आणि आंबेडकर यांच्या दुर्मीळ व नवीन पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
कलिना कॅम्पस्मध्ये भरविण्यात आलेले हे प्रदर्शन १४ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत सर्वांसाठी खुले असून, यामध्ये महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांची आणि त्यांच्यावर लिहिण्यात आलेली मराठी, इंग्रजी, कन्नड व गुजराती भाषांमधील दुर्मीळ पुस्तके पाहता येणार आहेत. तसेच डॉ. आंबेडकरांची मूळ हस्ताक्षरातील काही पत्रेही प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बहिष्कृत भारत, समता यांचे मूळ अंक तसेच डॉ. आंबेडकरांचे महाराष्ट्र अॅज अ लिंगविस्टिक प्रोव्हिन्स हा भाषिक राज्य पुनर्रचना आयोगाला दिलेला अहवाल, १९४८ साली तयार केलेली घटनेच्या मसुद्याची प्रत असे अनेक दुर्मीळ ग्रंथ प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहेत.
या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मुंबई विद्यापीठाने जागतिक दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरू करणार असून, याचा उद्देश देशातून व परदेशातून अनेक तज्ज्ञ व अभ्यासकांनी येथे
येऊन संशोधन व अभ्यास करावा, हा असल्याचे नरेश चंद्र यांनी या वेळी सांगितले.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय केंद्राचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. सुरेद्र जोंधळे यांचेही भाषण झाले. तसेच कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. उद्घाटन समारंभाप्रसंगी १७ डिसेंबर १९४६ रोजी संसदेमध्ये डॉ. आंबेडकरांनी केलेल्या व त्यांच्याच आवाजातील भाषणाचा संपादित अंश ऐकविण्यात आला.