परिवहनच्या भाडेवाढीला विशेष समितीची मंजुरी
By Admin | Updated: February 12, 2015 05:50 IST2015-02-12T05:50:19+5:302015-02-12T05:50:19+5:30
बेस्टपाठोपाठ आता ठाणे परिवहन सेवेनेदेखील (टीएमटी) आपल्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यासाठी दोन रुपये

परिवहनच्या भाडेवाढीला विशेष समितीची मंजुरी
ठाणे : बेस्टपाठोपाठ आता ठाणे परिवहन सेवेनेदेखील (टीएमटी) आपल्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यासाठी दोन रुपये तर शेवटच्या टप्प्यासाठी पाच रुपये भाडेवाढ करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव परिवहनच्या विशेष समितीने मंजूर केला आहे. आता तो पुढील मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवला जाणार आहे. ही भाडेवाढ तीन ते चार महिन्यांनंतर लागू होणार आहे.
दोन वर्षांपूर्वी मार्च २०१३ मध्ये परिवहनने पहिल्या टप्प्यासाठी १ रुपयाची भाडेवाढ केली होती. नव्या प्रस्तावानुसार पहिल्या टप्प्यासाठी २ रुपये, त्यानंतरच्या पुढील टप्प्यासाठी ३ रुपये आणि त्यानंतरच्या टप्प्यासाठी ५ रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांत डिझेलचे दर कमी झाले असले तरी टायर, स्पेअरपार्टचे दर वाढल्याने दरवाढ प्रस्तावित केल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. वातानुकूलित बसचीदेखील भाडेवाढ होणार असून पहिल्या टप्प्यासाठी पाच रुपये, दुसऱ्या टप्प्यासाठी १० रुपये आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १५ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. परिवहनचे सुरुवातीचे साध्या बसचे भाडे हे ५ रुपये आहे. आता त्यासाठी ७ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच ११ ऐवजी १३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १० किमीच्या पुढे १८ रुपयांऐवजी २१ रुपये मोजावे लागणार आहेत.
एसी बसचे सध्या पहिल्या टप्प्याचे भाडे १५ असून ते आता २० रुपये होणार आहे. तर शेवटच्या टप्प्याचे भाडे ७५ वरून ८५ रुपये होणार आहे. तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली. (प्रतिनिधी)