विशेष मुलांचा आधार

By Admin | Updated: April 23, 2017 01:36 IST2017-04-23T01:36:17+5:302017-04-23T01:36:17+5:30

काहीही चूक नसताना बरेचदा लहान मुलांना त्रास भोगावे लागतात. मात्र, त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी त्यांना योग्य मदत मिळणेही गरजेचे असते. ‘डिझायर’ही अशीच

Special child support | विशेष मुलांचा आधार

विशेष मुलांचा आधार

- भक्ती सोमण

काहीही चूक नसताना बरेचदा लहान मुलांना त्रास भोगावे लागतात. मात्र, त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी त्यांना योग्य मदत मिळणेही गरजेचे असते. ‘डिझायर’ही अशीच एक संस्था, जी आज एचआयव्ही पॉझिटिव्हग्रस्त मुलांना नवे जीवन देण्यासाठी काम करते आहे.

‘लहान मुले म्हणजे देवाघरची फुले’ असे म्हणतात, पण काही लहान मुलांवर आईवडिलांकडून एड्ससारख्या रोगाचा अनपेक्षितपणे आघात होतो आणि त्याचे परिणाम या कोवळ्या मुलांना नाहक भोगावे लागतात. त्यातून त्यांच्या वाट्याला येतो, तो समाजाचा रोष. पालकांपैकी कोणाला जर एड्ससारखा आजार असेल किंवा मूल पोटात असतानाच त्याला एचआयव्हीची लागण झाली, तर त्या मुलाचे पुढे काय हा प्रश्न उरतोच. म्हणूनच अशा एचआयव्ही पॉझिटिव्ह, एचआयव्हीग्रस्त मुलांना आधार देणे गरजेचे असते. हाच आधार या मुलांना ‘डिझायर’ ही संस्था देते आहे.
या मुलांना उद्भवणाऱ्या समस्या पाहून, २००५ साली रवी बाबू यांनी हैद्राबाद येथे डिझायर ही संस्था स्थापन झाली. त्यानंतर, बंगलोर, दिल्ली, विशाखापट्टणम, मुंबई या शहरात शाखा सुरू झाल्या. मुंबईत गोरेगाव येथे चारच वर्षांपूर्वी ही संस्था सुरू झाली. या संस्थेत एचआयव्ही बाधित मुलांबरोबरच एचआयव्हीमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या मुली राहातात, तर वाशी येथे फक्त मुलांचे वसतिगृह आहे. या दोन्हीकडे त्यांच्या राहण्या, जेवण्याची सर्व व्यवस्था केली जाते. या दोन्ही संस्थेत सध्या ४ ते १८ वयोगटांची मुले राहात आहेत.
या मुलांच्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देणेही अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी इथले प्रशिक्षक या मुलांची काळजी घेत असतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणेही गरजेचे असते. त्यासाठी त्यांना रोजच्या आहारात प्रोटिनयुक्त जेवणाचा समावेश केला जातो. याबाबतीत काटेकोरपणे काळजी घेतली जाते. रोजच्या स्वच्छतेकडेही बारकाईने लक्ष दिले जाते. यासाठी प्रशिक्षित डॉक्टर सदैव तप्तर असतात.
आलेल्या वाईट प्रसंगामुळे ही मुले सुरुवातीला खूप बुजलेली असतात. त्यांचे समुपदेशन करून ती ग्रुपमध्ये मिसळावीत, यासाठी प्रयत्न केले जातात. मुलांच्यातील सुप्त कलागुण ओळखून त्याद्वारे घडवण्याचाही प्रयत्न येथे केला जातो. मे महिन्यात मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेतील काही मुले सध्या दहावीत आहेत. अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या या मुलांना त्यांच्या आजाराचे कारण सांगत, अनेक शाळांनी प्रवेश नाकारला होता. अशा वेळी शाळांचे योग्य समुपदेश करावे लागले. सध्या इंग्रजी, मराठी आणि हिंदी माध्यमामध्ये ही मुले शिकत आहेत. यातील अनेक मुलांना शाळेत उत्तेजनार्थ बक्षिसे मिळतात. संस्थेतल्या अनेक कार्यक्रमात मुलांचा उत्साह बघण्यासारखा असतो.
या मुलांना खरी गरज आहे, ती सन्मानाने वागवण्याची. संस्थेमार्फत त्यांना माणूस म्हणून घडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न आता समाजानेही करायला हवेत.

बदल हवा... : साधारण एचआयव्हीग्रस्त मुले म्हटली की, लोक त्यांच्याशी बोलायला घाबरतात, पण ही मुलेही माणसेच आहेत. समाजाने आज या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलण्याची गरज आहे. त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे. आपण या मुलांना चांगले जीवन देण्यासाठी सहकार्य केले, तर त्यांना आपण क्वालिटी लाइफ देऊ शकतो.
- भूषण तोंडरे, प्रोग्राम मॅनेजर, गोरेगाव

Web Title: Special child support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.