काय देता ते बोला, मगच नावे देतो! - शिवसेना
By Admin | Updated: November 8, 2014 04:04 IST2014-11-08T04:04:03+5:302014-11-08T04:04:03+5:30
महाराष्ट्रातील सरकारमध्ये शिवसेनेला काय देता ते अगोदर सांगा मगच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकरिता दोन नावे देतो,

काय देता ते बोला, मगच नावे देतो! - शिवसेना
मुंबई : महाराष्ट्रातील सरकारमध्ये शिवसेनेला काय देता ते अगोदर सांगा मगच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकरिता दोन नावे देतो, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे.
केंद्र सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला केवळ एक मंत्रिपद आले. अनंत गीते यांच्याकडे अवजड उद्योगासारखे कमी महत्त्वाचे खाते दिले. आता मंत्रिमंडळ विस्तारात सुरेश प्रभू यांचे नाव शिवसेनेने द्यावे, असा आग्रह भाजपाने धरला आहे. परंतु शिवसेनेकडून अद्याप कोणाचेही नाव गेलेले नाही. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर आपल्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता येतील, अशी भीती शिवसेनेला वाटते. त्यामुळे महाराष्ट्रात काय देणार ते स्पष्ट करा, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे.
केंद्र सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून आपली वर्णी लागावी, यासाठी खासदार ‘मातोश्री’ला साकडे घालत आहेत. कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाकरिता बरीच चुरस आहे. अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव अढळराव-पाटील, आनंदराव अडसूळ असे अनेक जण इच्छुक असून, यापैकी काहींनी शुक्रवारी मुंबईत येऊन शिवसेनेतील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तर राज्यमंत्री पदासाठी भावना गवळी, संजय राऊत यांची नावे चर्चेत आहेत.
मंत्रिपद देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले होते. अजून आपल्याला दूरध्वनी आलेला नाही. परंतु शनिवारपर्यंत दूरध्वनी येईल, अशी अपेक्षा रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)