पुरंदरमधील विमानतळासाठी २० आॅक्टोबरपासून जागेचा सर्व्हे
By Admin | Updated: October 19, 2016 00:58 IST2016-10-19T00:58:22+5:302016-10-19T00:58:22+5:30
पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी येत्या २० आॅक्टोबर पासून जागेचा सूक्ष्म सर्व्हे करण्यास सुरुवात करण्यात येणार
_ns.jpg)
पुरंदरमधील विमानतळासाठी २० आॅक्टोबरपासून जागेचा सर्व्हे
पुणे : पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी येत्या २० आॅक्टोबर पासून जागेचा सूक्ष्म सर्व्हे करण्यास सुरुवात करण्यात येणार असून, ७ नोव्हेंबरला हा सर्व्हे पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, विमानतळासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यापूर्वी लोकांचा असंतोष कमी करण्यासाठी पॅकेजची तीन मॉडेल तयार करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त उत्तम मॉडेलचा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राव म्हणाले, ‘‘पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. लोकांचा विरोध कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने थेट संवाद साधण्यात येणार आहे. तसेच लोकांच्या संमतीशिवाय जमीन संपादित करण्यात येणार नाही. दरम्यान, विमानतळाचा सूक्ष्म सर्व्हे झाल्यानंतर कोणत्या जमिनी संपादित करण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या वतीने स्वतंत्र नोटिफिकेश्न प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
येथील शेतकऱ्यांना अमरावती (आंध्र प्रदेश), नवी मुंबई आणि कोची तीन मॉडेलचा अभ्यास करून पुरंदरसाठी स्वंतत्र मॉडेल तयार करण्यात येणार आहे. एकापेक्षा अधिक मॉडेल तयार करून पॅकेज घेताना पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये वन टाईम पुनर्वसन करण्यापेक्षा विकासामध्ये बाधित शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
>संपूर्ण पुरंदर तालुक्याचे महसूल रेकॉर्ड अद्ययावत करणार
महसूल विभागाच्या वतीने संपूर्ण पुरंदर तालुक्याचे महसूल रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे एका सातबाऱ्यावर नक्की किती खातेदार आहेत, वारसदार, प्रत्यक्ष जमीन कोण कसतंय आदी सर्व माहिती अद्ययावत होईल. जमिनीचा मोबदला देताना होणारे वाद यामुळे कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
विमानतळाच्या जागेबाबत संभ्रमच
पुरंदर तालुक्यातील नक्की कोणत्या गावांमध्ये हे विमानतळ होणार, हे अद्यापही प्रशासनाने अथवा शासनाने स्पष्ट केलेले नाही. यामुळे येथील नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांना विचारले असता त्यांनीदेखील गावांची नावे सांगण्यास टाळाटाळ केली.