आझाद मैदानात मेट्रो ३ साठी जागा
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30
कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३ प्रकल्पासाठी पाच वर्षांकरिता तर ७१८ चौरस मीटर जागा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कायमस्वरूपी देण्याचा निर्णय सरकारने घेतला.

आझाद मैदानात मेट्रो ३ साठी जागा
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेली येथील आझाद मैदानची ३० हजार ७७६ चौरस मीटर जागा कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३ प्रकल्पासाठी हंगामी म्हणजे पाच वर्षांकरिता तर ७१८ चौरस मीटर जागा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कायमस्वरूपी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
मेट्रो-३ हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आझाद मैदान पूर्ववत करण्यात येणार आहे. त्या वेळी हंगामी स्वरूपातील ३० हजार ७७६ चौ.मी.जागा सार्वजनिक बांधकाम विभागाला परत करण्यात येणार आहे. बांधकाम विभागाची ही जागा महसूल विभागाला दिली जाईल आणि महसूल विभाग मग ती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला हस्तांतरीत करेल. त्यासाठी नगरविकास विभाग, ना हरकत प्रमाणपत्र आधी घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली शासकीय व निमशासकीय जमीन देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने आधीच घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही जागा देण्याचा आदेश बांधकाम विभागाने आज काढला. मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कम्युनिटी डेव्हलपमेंट आॅफीसर दयानंद चिंचोलीकर यांनी सांगितले की आझाद मैदानची ३० हजार ७७६ चौरस मीटर जागा ही भूमिगत रेल्वेस्थानकाच्या उभारणीसाठी घेण्यात आली आहे. हे स्थानक तयार झाल्यानंतर ही जागा बांधकाम विभागाला परत करण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)